Sambhaji Raje : कोल्हापूर आणि सातारच्या राजेंची अचानक भेट, शिवेंद्रराजेंनी संभाजीराजेंची गाडी ओव्हरटेक करून थांबवली
वडील श्रीमंत शाहू महाराज यांनी त्यांचे कान टोचले. मात्र या प्रकारानंतर राजघराण्यात फूट पाडण्याचा हा डाव असल्याचे आरोप होऊ लागले. मात्र आज एक अशी घटना घडली आहे. ज्यामुळे सातरच्या राजेंचा आणि कोल्हापुरच्या राजेंचा जिव्हाळा पुन्हा दिसून आलाय.
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) यांचं नाव चांगलेच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच राजेंनी राज्यसभेची निवडणूक (Rajyasabha Election) अपक्ष लढण्याची घोषणा केली. तसेच इतर सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा असे आवाहनही केले. मात्र शिवसेनेने (Shivsena)त्यांना ही निवडणूक पक्षप्रवेश करुन लढण्याची ऑफर दिली होती. राजेंना ही ऑफर मान्य नव्हती. त्यानंतर शिवसेनेकडून त्या जागेसाठी संजय पवार यांचं नाव घोषित करण्यात आलं. संभाजीराजे यांनी दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेत या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर काल त्यांचे वडील श्रीमंत शाहू महाराज यांच्या पत्रकार परिषदेने पुन्हा एकदा राळ उठली. मात्र आज एक अशी घटना घडली की ज्यात या सगळ्या राजकारणाचा काहीही संबंध नव्हता. सातारा आणि कोल्हापूर या राजघराण्यांचे वंशज हायवेवर भेटले. या प्रसंगातून सातारच्या राजेंचा आणि कोल्हापुरच्या राजेंचा जिव्हाळा पुन्हा दिसून आला.
संभाजीराजेंनी ट्विट करून माहिती दिली
महामार्गावरून जात असताना शिवेंद्रराजे यांना पुढे संभाजीराजे यांची गाडी दिसली. यावेळी शिवेंद्रराजेंनी संभाजीराजे यांची गाडी ओव्हरटेक करून थाबवली आणि त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. संभाजीराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भेटीचा फोटो ट्विट केला…तसेच “आज प्रवासादरम्यान आमचे बंधू छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अचानक भेट झाली. महामार्गावर असून सुध्दा गाडी ओव्हरटेक करून त्यांनी भेट घेतली व आपुलकीने चौकशी केली. आनंद वाटला. कोल्हापूर व सातारा छत्रपती घराण्याचे ऋणानुबंध असेच वृद्धींगत राहोत, हीच आई भवानी चरणी प्रार्थना !” असे ट्विट केले आहे.
संभाजीराजेंचं ट्विट
आज प्रवासादरम्यान आमचे बंधू छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अचानक भेट झाली.
महामार्गावर असून सुध्दा गाडी ओव्हरटेक करून त्यांनी भेट घेतली व आपुलकीने चौकशी केली. आनंद वाटला. कोल्हापूर व सातारा छत्रपती घराण्याचे ऋणानुबंध असेच वृद्धींगत राहोत, हीच आई भवानी चरणी प्रार्थना ! pic.twitter.com/4yWzSGUsfW
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 29, 2022
अनेक शिवप्रेमींना आनंद देणारी पोस्ट
छत्रपती संभाजीराजेंची ही पोस्ट अनेक शिवप्रमींना आनंद देणारी आहे. कारण सातारच्या राजकारणात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे मतभेद अनेकदा महाराष्ट्राने पाहिले आहेत. मात्र सातारचे राजे आणि कोल्हापूरचे राजे यांच्यातला हा जिव्हाळाही अनेकदा पाहिला आहे. आज पुन्हा तेच चित्र सर्व शिवप्रेमींना पाहायला मिळालं आहे. त्यामुळे शिवप्रेमींसाठी हा मोठा क्षण आहे. तसेच दोन्ही राजेंसाठीही ही मोठी जमेची बाजू आहे. यानिमित्ताने काही काळापुरते का होईना पण राज्यसभा उमेदवारीवरुन सुरु असलेले रामायण शिवप्रेमींच्या आणि राज्यातील जनतेच्या विस्मरणात गेले, असे म्हणायला हरकत नाही.