सर्वात मोठी बातमी! चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाईफेक, प्रचंड गदारोळ, नेमकं काय घडलं?
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय.
पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. चंद्रकांत पाटील यांच्यावर पुणे जिल्ह्यातील पिंपरी शहरात शाईफेक करण्यात आलीय. चंद्रकांत पाटील यांनी काल भाषण करताना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं. शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी महापुरुषांनी भीक मागतल्याचं धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. पण त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहे. त्यांच्यावर पिंपरीत शाईफेक करण्यात आलीय.
चंद्रकांत पाटील आज पिंपरीत मोरया गोसावी या गणपती देवस्थानाच्या संजीवन समाधी सोहळ्याला हजेरी लावणार होते. या दरम्यान एका कार्यकर्त्याच्या घरी आले असता एका अज्ञात व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली.
विशेष म्हणजे अशाप्रकारची घटना घडू शकते, अशी शंका पोलिसांना आधीच होती. त्यामुळे संबंधित कार्यकर्त्याच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण तरीही ही अनपेक्षित घटना घडलीय.
चंद्रकांत पाटील यांनी काल एका कार्यक्रमात शाळांविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं. पण ते विधान आपल्याकडून चुकून निघाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. आपल्याला लोकवर्गणी म्हणायचं होतं, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. पण त्यांच्या वक्तव्याविरोधात समता परिषद आक्रमक झालीय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आलीय. पोलिसांनी शाईफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. शाईफेक केल्यानंतर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी शाईफेक करणाऱ्यांना पकडलं.