पुणे, सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्यानिमित्त जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी सांगली येथील मशिदीचा मुद्दा मांडला. सांगलीच्या कुपवाडनजीकच्या अनधिकृत मशीद बांधकाम केले असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणावरुन एक महिन्यापूर्वी दोन गटात हाणामारीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात एका गटाकडून तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी 15 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु आता राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महानगरपालिका प्रशासन कामाला लागले.
काय आहे अहवाल
राज ठाकरे यांनी सांगलीतल्या वादग्रस्त मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर महापालिका आणि पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले होते. विभागाकडून या ठिकाणी जागेच्या मोजणी गुरुवारी करण्यात आली. यानंतर महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी या जागेच्या बांधण्यात येणारे बांधकाम हे अनधिकृत असल्याचा स्पष्ट केले. या जागेवर सांगली महापालिकेच्या शाळेत आरक्षण होते. सुमारे सव्वा एकर क्षेत्रावर हे आरक्षण आहे. त्यामुळे अनधिकृत असल्याचा ठपका ठेवून तात्काळ या ठिकाणचा अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी स्पष्ट केले आहे.
घटनास्थळी बंदोबस्त
महापालिका आयुक्त पवार यांच्या निर्णयानंतर आता घटनास्थळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आता महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील या अतिक्रमण विरोधी पथकासह दाखल झाल्या आहेत.
नागरिकांची काय आहे मागणी
सांगलीत मशिदीच्या ठिकाणी महापालिकेचे शाळेचे आरक्षण असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला होता. त्यानंतर या ठिकाणी या दोन गटांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला होता. ही मशीद ही बेकायदेशीर बांधण्यात येत असून कोणतेही परवानगी नाही. या ठिकाणी महापालिकेच्या शाळेचं आरक्षण असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बहुसंख्य हिंदू समाज असल्याने मशिद नको,अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी मांडली आहे.
पुणे संदर्भात मनसेचा दावा
पुण्यात पुन्हा पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिर परिसरात अनधिकृत मशिदीचे बांधकाम केलं जातंय असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. मनसेकडून यासंदर्भात शुक्रवारी सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत कागदपत्रांसह पुरावे मांडण्यात येणार आहे. राज्य सरकारने या ठिकाणी उत्खनन करावे, अशी मागणी मनसेने केली आहे. राज्य सरकारने लवकर कार्यवाही केली नाही तर मनसे स्टाईलन आंदोलन करणार असल्याचे मनसेचे नेते अजय शिंदे यांनी म्हटले आहे.