वंचितला सोबत न घेतल्यास किंमत मोजावी लागणार?; संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे काय सुनावलं?

| Updated on: Mar 04, 2023 | 2:50 PM

विधिमंडळाला असं बोलायला मी काही वेडा नाही. माझं विधान एका विशिष्ट गटापुरतं होतं. ते सर्वांना माहीत आहे. शरद पवार यांनी त्यावर उत्तम भाष्य केलं आहे. विधिमंडळाला चोरमंडळ बोलणारा मी माणूस नाही.

वंचितला सोबत न घेतल्यास किंमत मोजावी लागणार?; संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे काय सुनावलं?
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. पण चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. महाविकास आघाडीने वंचित आघाडीचा पाठिंबा घेतला नाही. त्यानंतर वंचितने कलाटे यांना पाठिंबा देऊन त्यांचा प्रचारही केला. त्यामुळे कलाटे यांनी प्रचंड मते घेतली आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला सुनावले आहे. वंचितला सोबत न घेतल्याने काय परिणाम होऊ शकतो, याचे खडेबोलच राऊत यांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे सुनावले आहेत.

कसबा आणि चिंचवडच्या निकालाने महाविकास आघाडीला धडे दिले आहेत. महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहिलो तर कसब्याचा निकाल लागतो आणि थोडं जरी इकडे तिकडे झालं एखादा बंडखोर.. एखादा घटक पक्ष बाजूला गेला तर चिंचवडप्रमाणे निकाल लागतो. हा दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी दिलेला हा धडा आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला सुनावलं आहे. तसेच कसब्याचा निकाला हा 2024 निवडणुकीसाठी मार्गदर्शक आहे, असं सांगत वंचितला सोबत घेणं किती महत्त्वाचं आहे, असाच अप्रत्यक्ष सल्लाही राऊत यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

आमच्याकडून चूक झालीय

चिंचवडमध्ये आमच्या सर्वांकडून काही बाबतीत चूक झालीय. चिंचवडमध्ये भाजपचा विजय झाला आहे हे कोणीच मानणार नाही. चिंचवडमध्ये अनेक वर्ष जगताप पॅटर्न चालतो. त्या जगताप पॅटर्नचा विजय आहे. उमेदवार निवडताना काळजी घेतली असती किंवा राहुल कलाटेंना माघार घेण्यास यश आलं असतं तर तिथेही नक्कीच वेगळा निकाल लागला असता, असा दावा राऊत यांनी केला आहे.

आधी स्वत:चं अंतरंग तपासा

राऊत यांच्या अटकेची सत्ताधारी आमदार मागणी करत आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मागणीने जर अटक होत असेल तर होऊन जाऊ द्या. कायदा आणि न्यायालय, पोलीस अजून खोक्याखाली चिरडलेले नाहीत. अजूनही रामशास्त्री बाण्याचे काही लोक जिवंत आहेत. 40 आमदारांनी आधी स्वत:चे अंतरंग तपासावं अन् मग माझ्या अटकेची मागणी करावी, अशी टीका त्यांनी केली.

तसेच मी विधीमंडळाचा पूर्ण आदर करतो. विधिमंडळाला असं बोलायला मी काही वेडा नाही. माझं विधान एका विशिष्ट गटापुरतं होतं. ते सर्वांना माहीत आहे. शरद पवार यांनी त्यावर उत्तम भाष्य केलं आहे. विधिमंडळाला चोरमंडळ बोलणारा मी माणूस नाही. मीही त्या सभागृहाचा सदस्य आहे. मी कायदा आणि घटना मानणारा आहे. मी दौऱ्यावर आहे. नोटीस वाचावी लागेल. त्यानंतर मी उत्तर देईन, असं त्यांनी सांगितलं.

गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं

संदीप देशपांडेंचा विषय मला माहिती नाही. मी त्यावर बोलणार नाही. या देशातील कोणत्याही नागरिकांवर हल्ला होऊ नये. असं आमचं मत आहे. कोणी कोणावर हल्ला करत असेल तर गृहमंत्र्यांनी त्यात लक्ष घालायला पाहिजे, असं ते म्हणाले.