एकनाथ शिंदे यांच्यावर आमचाही विश्वास होता, पण… संजय राऊत यांचं मोठं विधान
चार राज्यातील निवडणूक निकालांवरही त्यांनी भाष्य केलं. तेलंगणात केसीआरचा पराभव करणं हा तिथे मोठा टास्क होता. केसीआर त्या राज्याचे निर्माते होते. भाजपला 10 आमदारांचा टप्पा गाठता आला नाही. राजस्थानात पाच पाच वर्षानी तिथे सरकार बदलत असते. मध्यप्रदेशात मोदी आणि शाहस यांची लाट कुणालाही दिसली नाही. इतक्या यंत्रणा तिथे फिरत आहेत. मोदी आणि शाह यांचं सरकार तिथे आलं, असं संजय राऊत म्हणाले.
सागर सुरवासे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 10 डिसेंबर 2023 : ओबीसींचे काही नेते मराठा समाजाविरोधात बोलत आहेत. मीच घडवून आणतोय हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं. हा सर्व फडणवीस यांचा डाव आहे. बोलणारी सर्व त्यांच्या जवळची माणसं आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यावरचा आमचा विश्वास उडाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास आहे. शिंदेच धाडसी निर्णय घेतील, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर आमचाही विश्वास होता. पण ते सुरतला पळून जाण्याआधी विश्वास होता, असा टोला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. ते मीडियाशी संवाद साधत होते.
संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना विविध मुद्द्यांना हात घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदीही पुण्यात सभा घ्यायला धजावत नाहीत. मोदींवर महाराष्ट्रातील जनतेचा रोष दिसून येतो, असं सांगतानाच 2024मध्ये सोलापूरचं राजकीय चित्र बदलेलं असेल. सोलापूरचा विषय निघाला की प्रकाश आंबेडकरांचा विषय असतो. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिका काळजीपूर्वक पाहिल्यावर त्यांना महत्त्वाचे पाऊल उचलावे लागले असं वाटतं. प्रकाश आंबेडकर यांनी हुकूमशाही राजवटीविरोधात दंड थोपाटले आहेत, असं संजय राऊत म्हणाले. प्रकाश आंबेडकरांशी आमची सर्वचं बाबतील चर्चा जवळजवळ संपलेली आहे. उद्याच्या देश वाचवण्याच्या लढाईत प्रकाश आंबेडकर हे नक्कीचं आघाडीवर असतील, असंही ते म्हणाले.
हुकूमशाहांची नोंद होत नाही
निवडणुक आयोगाला कुणाची गुलामी करायची ती करू द्या. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हा शरद पवारांचा आहे. शिवसेना संपवण्याचे प्रयत्न खूप वेळा झाला. पक्ष असे सहज मोडता येत नाही. देशाच्या इतिहासातून मोदी आणि शाह निघून जातील. हुकूमशाहीची नोंद देशात राहत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
धनगर आणि ओबीसी वाद पेटवण्याचं काम
धनगर आणि ओबीसी वाद पेटवण्याचं काम भाजपा करत आहे. ओबीसी विरूद्ध मराठा हा वाद निर्माण करून भाजपला निवडणुकीला सामोर जायचं आहे. बाळासाहेबांची भूमिका आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची होती. ओबीसी आणि मराठा समाजातील दुर्बल घटकांना आरक्षण मिळावं हि मागणी चुकीची नाही. नरेद्र मोदी जगाचे प्रश्न सोडवतात. युक्रेनचं युद्ध सोडवतात, बायडनला मिठ्या मारतात. मग महाराष्ट्राचा प्रश्नावर का नाही बोलत? हिंदू आणि मुस्लिम नाणं असं गुळगुळीत झालेलं आहे. महाराष्ट्र अशा दिव्यातून कधी गेल्या नव्हता, असंही ते म्हणाले.
समाजकंटक भाजपमध्ये नाही का?
मनोज जरांगे पाटलाना आवाहन देण्यासाठी काही लोक उभे केले आहेत. फडणवीसांनी उत्तर देण्यासाठी भुजबळांना पॉवर ऑफ अॅटिर्नी दिलेली आहे. ओबीसीच्या ताटातील न काढता जरांगेच्या ताटात द्या, असं त्यांनी स्पष्ट केलं. समाजकंटक भाजपामध्ये शिरले नाहीत का? भाजपचे लोक दुस-यांना चप्पल मारत नाही का?, असा सवाल त्यांनी केला.
बॅलेट पेपरवरचा ट्रेंड वेगळा
बॅलेट पेपरवरचा ट्रेंड वेगळा आणि ईव्हीएमचा वरचा वेगळा होता. देशातील एक निवडणूक भाजपाशासित राज्यात बॅलेट पेपरवर घ्या. तो निकाल आम्ही सर्व मान्य करू. ईव्हीएममध्ये घोटाळा होवू शकतो हे भाजपचे नेतेही सांगतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.