प्रदीप कापसे, पुणे | 10 नोव्हेंबर 2023 : नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या ललित पाटील याला एका ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली होती. तीन वर्षांच्या येरवडा कारागृहातील काळात तो तब्बल नऊ महिने ससून रुग्णालयात राहिला. त्यानंतर ससून रुग्णालयातून तो फरार झाला. ललित पाटील फरार झाल्यानंतर त्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले. पोलीस आणि ससून रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी संशयाच्या भवऱ्यात आले. ललित पाटील फरार झाल्यानंतर त्याला पंधरा दिवसांनी अटक झाली. मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी झाली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्स जप्त केले. या प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे सातत्याने आरोप करत आहेत. आता ललित पाटील याला मंत्रालयातून मदत झाल्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.
ललित पाटील याने 9 महिन्यांत कोट्यावधी रुपये वाटले आहे. आजारपणाचे नाटक करुन तो ससून रुग्णालयात राहिला. त्याला ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर आणि पोलिसांनी मदत केली. या काळात ललित पाटील याला पंचताराकीत सुविधा दिल्या गेल्या. त्यासाठी त्याने कोट्यवधी रुपये वाटले, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. त्यामुळे संजीव ठाकूर यांची नार्को चाचणी केली पाहिजे. त्यातून सत्य बाहेर येईल. केवळ त्यांची बदली करुन काही होणार नाही, असे धंगेकर यांनी म्हटले आहे.
संजीव ठाकूर यांना मंत्रालयातून मदत करण्यात आली. त्याची मंत्र्याशी ओळख आहे. यामुळे या प्रकरणात सत्य बाहेर आणावे, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे. तसेच संजीव ठाकूर याच्यावर पोलीस कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. ठाकूर यांना सोलापूरवरुन पुण्यात आणले. हे भाजपने त्याचे केलेले पुर्नवसन होते. यामुळे संजीव ठाकूर यांची नार्को टेस्ट केली पाहीजे. त्यावेळी ललित पाटील याची नार्को टेस्ट केली पाहीजे, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.