योगेश बोरसे, पुणे | 27 ऑक्टोंबर 2023 : पुणे पोलिसांनी एका ड्रग्सच्या खटल्यात ललित पाटील याला अटक केली होती. गेल्या तीन वर्षांपासून ललित पाटील येरवडा जेलमध्ये होता. त्यातील नऊ महिने तो कारागृहात होता. जून महिन्यापासून तो पुन्हा रुग्णालयात दाखल झाला. त्याला हार्निया असल्याचे कारण दिले होते. त्याच्या या आजारावर चक्क ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनीच उपचार केले. कैद्यांच्या वार्ड १६ मध्ये डीन संजीव ठाकूर यांच्याकडूनच ललित पाटील याच्यावर उपचार करण्यात आले. ससूनच्या रजिस्टरमध्ये ठाकूर यांच्या नावाचा उल्लेख आहे. हर्निया या आजारावर ललित पाटील याच्यावर उपचार सुरु असल्याचा उल्लेख केला आहे.
ललित पाटील याच्या आजारासंदर्भात अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना काही दिवसांपूर्वी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, ललित पाटील यांच्या आरोग्याप्रश्नी हायकोर्टाकडूनही पत्र आलं होतं. त्यानुसार, तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्या तपासणीनंतर हायकोर्टाला उत्तर पाठवण्यात आले. ललित पाटील याला चार ते पाच प्रकारचे आजार झाले होते. परंतु नेमके कोणते आजार झाले होते? हे संजीव ठाकूर यांनी सांगितले नाही.
ललित पाटील प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर यांनी डीन संजीव ठाकूर यांना घेरले आहे. संजीव ठाकूर यांच्या आशीर्वादामुळे ललित पाटील ९ महिने ससूनमध्ये राहिला आहे. यामाध्यमातून ठाकूर यांनी मोठी माया जमवली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी आमदार धंगेकर यांनी केली. संजीव ठाकूर यांनी बोगस पद्धतीने ललित पाटील याच्यावर उपचार केले आहेत. डीन स्वत: कधीच उपचार करत नाहीत. परंतु या प्रकरणात असे घडल्यामुळे संजीव ठाकूर याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
ललित पाटील जून पासून सप्टेंबर महिन्यापर्यंत ससून रुग्णालयात थांबला होता. हार्नियाच्या आजारासाठी कोणत्याही रुग्णास चार पाच महिने लागत नाही. पंधरा दिवसांत या आजारावर उपचार होत असता. यामुळे या प्रकरणात संजीव ठाकूर अडचणीत येणार आहे.