सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नाना पटोले यांना नो एंट्री!
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येणार होते. त्यांचा विद्यार्थी संवाद कार्यक्रम विद्यापीठात आयोजित करणार येणार होता. पण त्यांच्या कार्यक्रमाला विद्यापीठ प्रशासनाकडून परवानगी मिळाली नसल्याची माहिती मिळत आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नाना पटोले यांच्या ‘विद्यार्थी संवाद’ कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आहे. विद्यार्थी संघटनांची विनंती विद्यापीठ प्रशासनाने धुडकावली आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक अडचणी, सतीगृह, भोजनगृहाचा दर्जा, राष्ट्रीय शैक्षणीक धोरण आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी नाना पटोले 10 मे ला विद्यापीठात येणार होते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी नाना पटोले यांचा एक कार्यक्रम देखील विद्यार्थ्यांनी विद्यापीठात आयोजित केला होता. मात्र विद्यापीठ प्रशासनाकडून पटोले यांच्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आली आहे.
विद्यापीठातील विविध विद्यार्थी संघटनांनी नाना पटोले यांचा ‘विद्यार्थी संवाद’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. विद्यापीठात 10 मे ला G20 परिषदेच्या अनुषंगाने कार्यक्रम असल्याने ही परवानगी मिळणार नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे. मात्र विद्यार्थी अद्यापही नाना पटोले यांचा कार्यक्रम घेण्यावर ठाम आहेत.
पुणे विद्यापीठात नुकतंच एका प्रकरणामुळे वाद उफाळला
पुणे विद्यापीठात नुकतंच एका प्रकरणामुळे मोठा वाद उफाळला होता. एक विद्यार्थ्याने विद्यापीठ परिसरात आक्षेपार्ह भाषेतील रॅप साँग चित्रित केलं होतं. या विद्यार्थ्याने आपण विद्यापीठाची तोंडी परवानगी घेतली होती, असा दावा केला होता. पण नंतर विद्यापीठाकडूनच संबंधित रॅप साँग समोर आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
दुसरीकडे अश्लील गाण्याच्या चित्रीकरणास परवानगी दिली म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चांगलीच आक्रमक झाली होती. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर या आंदोलकांनी कागदपत्रे फाडून ते उधळतानाच विद्यापीठातील दरवाजे आणि खिडक्यांच्या काचाही फोडल्या.
विद्यार्थ्यांनी अचानक केलेल्या या राड्यामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली. राड्यामुळे कुलगुरुंनाही बैठक थांबवावी लागली. तब्बल तासभर या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. विशेष म्हणजे कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या बैठकीला सिनेटचे सदस्यही उपस्थित होते. ही बैठक सुरू असतानाच अचानक घोषणाबाजीचा आवाज आला.
काही कळायच्या आत अभाविपच्या कार्यकर्त्यांची झुंडच्या झुंड बैठकीच्या ठिकाणी शिरली. कुलगुरुंशी कोणतीही चर्चा न करता या आंदोलकांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. खिडक्यांच्या काचा फोडल्या. दरवाजाच्या काचा फोडल्या. कागद फाडून तेही उधळले. ही तोडफोड करत असताना आंदोलक जोरदार घोषणाबाजी देत होते. संबंधित प्रकरणाची दखल राजभवानाकडूनही घेण्यात आलेली. या प्रकरणी राजभवानाने पुणे विद्यापीठाकडे अहवाल मागवला होता.