पुणे: हेमंत रासणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी मिळेल अशी आशा होती. आम्ही पक्षाकडे तिकीटाची मागणीही केली होती. पण तिकीट देण्यात आलं नाही. का दिलं नाही माहीत नाही? अशी भावूक प्रतिक्रिया व्यक्त करताना शैलेश टिळक यांचा कंठ दाटून आला होता. त्यांच्या डोळ्यात पाणीही आलं होतं. मुक्ता टिळक यांच्या आजारपणातील कामावर अन्याय झाला, असंही ते म्हणाले. तसेच आम्ही पक्षासोबतच राहू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना शैलेश टिळक यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कसबा पोटनिवडणूक जाहीर झाली. कोणताही पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर साधारण एखाद्याच्या घरातील व्यक्तीचं निधन झालं असेल तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला नैसर्गिकपणे उमेदवारी दिली जाते. मीही उमेदवारीची मागणी केली होती, असं शैलेश टिळक म्हणाले.
वर्ष सव्वा वर्षाचा कालावधी राहिला आहे. मुक्ता ताईंचं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी घरातील व्यक्तीला उमेदवारी द्या अशी मागणी मी केली होती. पण पक्षाने वेगळा निर्णय घेतलेला दिसतोय. तो आम्हाला मान्य आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काल चर्चा झाली. उमेदवारी देण्याबाबत अजून काही निर्णय झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं. दिल्लीतून निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं होतं. आज उद्या निर्णय होईल असंही ते म्हणाले होते. तसेच ताई गेल्यानंतर घरी यायचं राहिलं होतं. त्यामुळेही फडणवीस काल घरी आले होते. काल त्यांनी कोणतंही इंडिकेशन दिलं नव्हतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ताई गेली 20 वर्ष काम करत होत्या. त्यांनी पक्षात विविध पदावर कामं केली. पक्ष जो आदेश देईल त्यानुसार पुढे जायचं हेच त्यांचं धोरण होतं. आमचंही तेच धोरण आहे. पक्षाने जो निर्णय दिला तो आम्हाला मान्य आहे. फक्त खंत एवढीच आहे की, ताईंनी आजारपणाच्या काळात जे काही काम केलं त्यावर अन्याय झाला असं वाटतं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. असं सांगताना शैलेश टिळक यांचं कंठ दाटून आला. त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं.
पक्षाने वेगळा विचार का केला? कसा केला माहीत नाही. पण आम्ही पक्षासोबत राहणार आहोत. वेगळा विचार काही करणार नाही, असंही त्यांनी शेवटी स्पष्ट केलं.