प्रदीप कापसे, पुणे, दि.2 फेब्रुवारी 2024 | गँगस्टर शरद मोहोळ याच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी गणेश मारणे याला अटक झाली. गेल्या तीन आठवड्यांपासून तो फरार होता. या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात साहील उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे हे मुख्य आरोपी म्हटले जात होते. परंतु त्यानंतर गणेश मारणे हाच सूत्रधार असल्याचे समोर आले. आता या प्रकरणात शरद मोहोळ याची पत्नी स्वाती हिने पोलिस जबाबात दिला आहे. त्यात धक्कादायक दावा केला आहे. गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार याच्यापासून जिवाला धोका असल्याचा दावा केला आहे. यामुळे मोहोळ कुटुंबियांच्या जीवावर कोण उठले आहे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे शहराचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी पदभार घेतला. त्यांची ही पहिलीच पोस्टींग आहे. पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून गुंडगिरी आणि गँगस्टर वाढले आहेत. ते मोडून काढण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. मागील महिन्यात यामुळे शरद मोहोळ याची हत्या त्याच्या घराजवळ झाली. आता शरद मोहोळ याच्यानंतर स्वाती मोहोळ यांना संपवण्याचा गुंड टोळ्यांचा घाट असल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबातून समोर आले आहे. शरद मोहोळ याच्या पत्नीने याबाबत कोर्टात पुरवणी जबाब नोंदवला आहे.
गणेश मारणे हा गेल्या तीन आठवड्यापासून फरार होता. तो केरळ, ओडिशा, कर्नाटक या राज्यात फिरून नाशिकला आहे. त्याला त्या ठिकाणी अटक करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले. गणेश मारणे याच्यावर २००८ पासून एकही गुन्हा नाही.
त्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा त्याचा वकिलांनी कोर्टात केला होता. परंतु शरद मोहोळ खून प्रकरणात गणेश मारणे मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर आठ गंभीर गुन्ह्याची नोंद आहे, यामुळे त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून गणेश मारणे याला ९ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.