Sharad Pawar : ब्राह्मण नेत्यांच्या चार मागण्या, पवारांनी प्रत्येक मागणीचं सविस्तर उत्तर दिलं
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते ब्राह्मण समाजाविरोधात टीका करत असतात. याबाबतची तक्रार ब्राह्मण नेत्यांनी पवारांकडे मांडली. त्यावर अशा नेत्यांना समज देण्यात आल्याचं पवारांनी सांगितलं.
पुणे: ब्राह्मण नेत्यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी पवारांशी चर्चा केली. पवारांकडे समाजाच्या मागण्या मांडल्या. पवारांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं. ब्राह्मण समाजाच्या (Brahmin) प्रमुख चार मागण्या होत्या. त्यापैकी काही मागण्या या सरकारशी संबंधित होत्या. तर काही राष्ट्रवादीशी (ncp) संबंधित होत्या. ज्या बातम्या राष्ट्रवादीशी संबंधित होत्या. त्याच्याबद्दल पवारांनी तात्काळ भूमिका स्पष्ट केली. तसेच ब्राह्मण समाजाचा झालेला गैरसमज दूर केला. आरक्षणाच्या मागणीवर पवारांनी ब्राह्मण समाजाचे कान टोचले. तर महामंडळ आणि इतर मागण्या या सरकारशी संबंधित असल्याने मुख्यमंत्र्यांची तुमची भेट घेऊन चर्चा घडवून आणतो. मुख्यमंत्री ज्या गोष्टी रास्त वाटतील त्यावर निर्णय घेतील, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादीच्या नेत्यांना समज
राष्ट्रवादीचे नेते ब्राह्मण समाजाविरोधात टीका करत असतात. याबाबतची तक्रार ब्राह्मण नेत्यांनी पवारांकडे मांडली. त्यावर अशा नेत्यांना समज देण्यात आल्याचं पवारांनी सांगितलं. आमच्या पक्षाची बैठक झाली. त्यात जाती धर्माविरोधात बोलू नये, धोरणाच्या संदर्भात बोलावं, असं नेत्यांना सांगण्यात आलं. तसेच हा विषय संपवावा असं मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं. आजच्या बैठकीत हा विषय निदर्शनास आणून दिला आहे. त्यामुळे संघटनांनी नंतर आग्रह धरला नाही, असं पवार म्हणाले.
आरक्षण नाहीच
या बैठकीत ब्राह्मण संघटनांनी आरक्षणाची मागणी केली होती, असं पवारांनी सांगितलं. अलिकडच्या काळात ग्रामीण भागातील वर्ग नागरी भागात जास्त येत आहे. त्यामुळे साहजिकच सर्व्हिस सेक्टरमध्ये त्यांना संधी हवी आहे. महाराष्ट्रातील आणि केंद्राची आम्ही माहिती गोळा केली होती. त्याची आकडेवारी माझ्याकडे नाही. पण त्यात नोकऱ्याचं प्रमाण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. आरक्षण असावं असं त्यांनी मागणी केली. पण त्यांना मी म्हटलं आरक्षणाचं सूत्रं बसणार नाही. ते म्हणाले, मग कुणालाच आरक्षण नको. मी म्हटलं, असं करता येत नाही. दलित, आदिवासींना आरक्षण द्यावं लागेल. कारण हा वर्ग शिक्षण व इतर क्षेत्रात मागे आहे. तो इतरांच्या बरोबर आल्याशिवाय आरक्षणावर बोलता येणार नाही. मी माझं मत सांगितलं. त्यावर आमचं धोरण बदलतो असं ते म्हणाले नाहीत, असं पवारांनी स्पष्ट केलं.
परशुराम महामंडळाची मागणी
त्यांचा तिसरा मुद्दा हा महामंडळाचा होता. विविध समाजासाठी विकासाला मदत करण्यासाठी महामंडळ असतात. त्यामुळे आमच्यासाठीही महामंडळ असावं असं त्यांनी सूचवलं. परशुराम महामंडळाची सूचना केली. मी त्यांना सांगितलं हा विषय माझ्या हातात नाही. राज्य सरकारच्या हातात हा विषय आहे, असं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणणार
त्यांचे काही प्रश्न राज्य सरकारच्या संबंधिचे होते. या प्रश्नाबाबत मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करेल. तुमच्या सोबत मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणून देईल. मुख्यमंत्री त्यांच्या सोईने महिना, दीड महिन्यात तारीख देतील. तुमचे जे काही प्रश्न रास्त असतील त्याची नोंद राज्याचे मुख्यमंत्री घेतील. तुमचे पाच सहा प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांसोबत येतील. हे सांगितल्यानंतर आमची बैठक संपली, असं पवारांनी सांगितलं.