राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांच्यासोबत परिवारातील आणखी एक व्यक्ती, राजकारणात एन्ट्री करणारा कोण?
Sharad Pawar and Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासोबत परिवारातील आणखी एक जण राजकारणात येण्याची तयारी करत आहे. रोहित पवार यांच्यानंतर शरद पवार यांचा आणखी एक नातू राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
प्रदीप कापसे, पुणे, दि.23 डिसेंबर | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर अनेक जणांनी शरद पवार यांची साथ सोडली. पुणे जिल्ह्यातील शरद पवार यांचे विश्वास दिलीप वळसे पाटीलसुद्धा अजित पवार यांच्याबरोबर गेले. यावेळी शरद पवार यांची साथ परिवारातील रोहित पवार याने दिली. शरद पवार विस्कळीत झालेली घडी बसवत असताना एकीकडे सुप्रिया सुळे आणि दुसरीकडे रोहित पवार विरोधकांना घेरु लागले. रोहित पवार यांनी राज्यात युवा संघर्ष यात्रा काढली. आता शरद पवार यांच्यासोबत परिवारातील आणखी एक जण राजकारणात येण्याची तयारी करत आहे. शरद पवार यांचा आणखी एक नातू राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार राजकारणात पदार्पण करण्याच्या चर्चा सुरु झाली आहे.
कोण आहेत श्रीनिवास पवार
श्रीनिवास पवार उद्योजक आहेत. त्यांचा शरयू ग्रुप आहे. हा ग्रुप कृषी, ऑटोमोबाईल, रियल इस्टेट, डिलरशीप आणि सिक्युरीटी सर्व्हिसेसमध्ये कार्यरत आहे. श्रीनिवास पवार राजकारणापासून बाहेर राहतात. शरद पवार त्यांचे काका आहेत. परंतु आता त्याचा मुलगा युगेंद्र राजकारणात येत आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर युगेंद्र पवार शरद पवारांसोबत दिसून आले. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेचे युगेंद्र पवार आयोजक आहेत. बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
शरद पवार यांची पुणे शहरात सभा
शरद पवार यांची ३० तारखेला पुण्यात जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या सभेसाठी परवानगी पोलिसांकडे मागितली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ही सभा होणार आहे. पुण्यात सभेची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. शरद पवार लवकरच पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरु करणार आहे. पुण्यातून पवार पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शरद पवार यांच्या भेटीसाठी शनिवारी दाखल झाले. पवारांच्या मोदी बाग या निवासस्थानी जयंत पाटील यांनी भेट घेतली. परंतु दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, ती माहिती मिळू शकली नाही.