शरद पवारांचं शिंदे-फडणवीसांना गोविंद बागेत जेवणाचं निमंत्रण, राजकारणात पडद्यामागे काय घडतंय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून बारामती दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना गोविंद बागेत जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
पुणे | 29 फेब्रुवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या 2 मार्चला बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामती दौऱ्यावर येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना चहापानाचं निमंत्रण दिलं आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना गोविंद बागेत येण्याचं आणि जेवणाचं आमंत्रण दिलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. अजित पवार यांनी पुकारलेल्या बंडानंतर शरद पवार यांचे समर्थक आणि अजित पवार यांचे समर्थक अशा दोन गटात पक्ष विभागला गेला आहे. असं असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गोविंद बागेत जेवणाचं निमंत्रण दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिंदे-फडणवीस निमंत्रण स्वीकारणार?
बारामतीत येत्या 2 मार्चला नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. बारामतीत विद्या प्रतिष्ठान येथील 12 एकराच्या मैदानावर रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तसेच खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि इतर लोकप्रतिनिधींनादेखील या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. विशेष म्हणजे निमंत्रण पत्रिकेतही शरद पवार यांचं नाव वगळण्यात आलं आहे. असं असताना शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपल्या घरी जेवणाचं निमंत्रण दिलं आहे. त्यांचं हे निमंत्रण फडणवीस, पवार आणि शिंदे स्वीकारतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
पवारांच्या कृतीतून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं नेहमी कौतुक केलं जातं. सत्ताधारी आणि विरोधक कितीही एकमेकांच्या विरोधात टीका-टीप्पणी करत असले तरी ते समोरासमोर जेव्हा भेटतात तेव्हा खूप सौजन्याने वागतात. विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये घट्ट मैत्रीदेखील असते. फक्त ते राजकारणाच्या आखाड्यात एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू बनलेले बघायला मिळतात. ही राजकीय संस्कृती सध्या लुप्त होत चालली आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी अतिथी देवो भव: ही भावना मनात ठेवून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं आहे. शरद पवार हे नेहमी बारामतीत येणाऱ्या नेत्यांना आपल्या घरी येण्याचं तसं निमंत्रण देत असतात. तसेच याआधी अनेक नेत्यांनी शरद पवारांची गोविंद बागेत जावून भेट घेतल्याचा इतिहास आहे.