पुण्यात चेंज होतोय, याचा अर्थ… शरद पवार यांचं सूचक विधान काय?
यावेळी कांदा प्रश्नावरून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. मी परवा नगर जिल्ह्यात होतो. नाशिकच्या भागात होतो. त्यावेळी लोकांनी मला कांद्याबाबतच सांगितलं. कांदा पडलेला आहे. काही ठिकाणी फेकून दिला आहे.
बारामती : देशाचा मूड बदलत आहे. देशात बदलाचं वारं वाहत आहे, असं सांगतानाच कसब्यात भाजपला फक्त दोन ठिकाणीच अधिक मते मिळाली. इतर ठिकाणी भाजपला नाकारलं आहे. पुण्यात हा चेंज होतोय. याचा अर्थ लोक वेगळा विचार करत आहेत, असं मोठं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं. शरद पवार हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी शरद पवार यांनी कसब्याच्या निवडणुकीचं विश्लेषण करतानाच भाजप देशात कोणत्या कोणत्या राज्यात नाही, याची माहितीही दिली.
कसब्यात भाजपचा झाला आता पराभव. म्हणून तर मी म्हणतो हा बदल आहे. कसब्यातील मतांची माहिती घेतली. फक्त दोन ठिकाणी भाजपला अधिक मते मिळाली. नाही तर सरसकट आघाडीला मते मिळाली. शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ आदी व्यावसायिक ठिकाणी रवींद्र धंगेकरांना अधिका मते मिळाली आहे. हा चेंज आहे. हा चेंज पुण्यात होतोय. याचा अर्थ लोक वेगळ्या विचारासाठी सज्ज होत आहेत, असं शरद पवार म्हणाले.
शिंदे-फडणवीस काहीच करत नाही
यावेळी कांदा प्रश्नावरून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. मी परवा नगर जिल्ह्यात होतो. नाशिकच्या भागात होतो. त्यावेळी लोकांनी मला कांद्याबाबतच सांगितलं. कांदा पडलेला आहे. काही ठिकाणी फेकून दिला आहे. अतिशय वाईट परिस्थिती आहे. केंद्र आणि राज्य सरकार त्यावर निर्णय घेत नाही. आम्ही सत्तेत असतानाही कांद्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पण आम्ही कांदा खरेदी केला. नाफेडला खरेदी करायला लावला. त्याचा आर्थिक बोझा उचलला. पण सध्याचं शिंदे-फडणवीस सरकार आहे. ते या प्रश्नावर करतो करतो म्हणतात पण अजून काही करत नाही…त्यांनी अजून काही केलं नाही, अशी तीव्र नाराजी शरद पवार यांनी व्यक्त केली.
अन् शरद पवार भडकले
कोकणात उद्धव ठाकरे यांची सभा आहे. या सभेला हजर राहण्यासंबंधीचं एक पत्रक मुस्लिमांनी काढलं आहे. त्याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर पवार पत्रकारावरच भडकले. कोणी कुणाच्या सभेला जावं यावर मी उत्तर द्यायचं? तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत त्याचं तरी तारतम्य ठेवा, अशा शब्दात पवारांनी पत्रकारांना सुनावले.
नागालँडबाबत निर्णय घेऊ
यावेळी नागालँडमधील राष्ट्रवादीच्या यशावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. नाग्यालँडला आम्हाला 7 जागी विजय मिळाला आहे. सत्ताधारी पक्षाविरोधात आम्ही तेथे आहोत. आमचे प्रतिनीधी आम्ही नागालँडला पाठवले आहेत. ते तेथील आढावा घेतील. त्यानंतर निर्णय घेऊ. मी नागालँडच्या जनतेचे आभार मानतो, असं ते म्हणाले.