शरद पवार यांचा पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांना संतप्त सवाल; म्हणाले, आताच आठवण…
या आणखी एक गंमतीशीर गोष्ट या निकालातून पुढे आली. व्हीप मोडला तर कारवाई करता येते आणि अपात्रही ठरवता येते. इथे व्हीप मोडला म्हणून शिंदे गटाच्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी झाली होती. पण व्हीप देणाऱ्याला व्हीप देण्याचा अधिकारच नाही असं सांगून स्पीकरने 16 आमदारांना पात्र ठरवलं. त्यांना अपात्र ठरवलं नाही.
योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 10 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर निर्णय दिला आहे. नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं नाही. पण शिंदे गटाच्या आमदारांना अभय दिलं आहे. तसेच शिंदे गटाकडे पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचा ताबा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी हा निर्णय लोकशाही विरोधी असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी राहुल नार्वेकर यांना संतप्त सवालही केला आहे.
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन निकालावर भाष्य केलं. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावरही टीका केली आहे. निकाल दोन दिवसावर आहे. ज्यांची केस दोन दिवसांवर त्यांना भेटायला स्पीकर जातात याचा अर्थ काय? उद्या एखाद्याची केस हायकोर्टात असेल आणि न्यायाधीशच जर ज्याची केस आहे त्याच्या घरी दोन दिवस आधी जात असेल तर कसं होईल? त्यांनी सांगितलं माझ्या मतदारसंघातील कामे होती. मतदारसंघातील कामे करायला आताच आठवण झाली का? इतक्या दिवसापासून ते सभागृहाचे सदस्य आहेत. तेव्हा कामं करता आली नाही का? असा संतप्त सवाल शरद पवार यांनी केला.
निकाल असाच येईल वाटलं होतं
नार्वेकर यांनी दिलेला हा निकाल असाच लागेल असं वाटत होतं. त्यांचा दृष्टीकोण दिसत होता. न्यायालय आणि संविधान याच्यावर आधारीत निकाल न देण्याची त्यांची भूमिका होती. हा निर्णय इतरांनाही लागू होईल, असं शरद पवार म्हणाले.
हा राजकीय निवाडा
आता हा निकाल लोकांच्या कोर्टात होणार आहे. आम्ही महाविकास आघाडीतील सर्व लोक सामुदायिकपणे जनतेसमोर जाणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाची गाईडलाईन बाजूला ठेवून कसा निर्णय दिला याची माहिती आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. हा न्यायालयीन निवाडा नाही, हा राजकीय विचारांचा निवाडा आहे, तो जनतेत मांडता येईल. सत्तेचा गैरवापर कसा होतो हे जनतेत मांडू हा कार्यक्रम सुरू होईल, असंही त्यांनी सांगितलं.
गाईडलाईन बाजूला ठेवली
या आणखी एक गंमतीशीर गोष्ट या निकालातून पुढे आली. व्हीप मोडला तर कारवाई करता येते आणि अपात्रही ठरवता येते. इथे व्हीप मोडला म्हणून शिंदे गटाच्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी झाली होती. पण व्हीप देणाऱ्याला व्हीप देण्याचा अधिकारच नाही असं सांगून स्पीकरने 16 आमदारांना पात्र ठरवलं. त्यांना अपात्र ठरवलं नाही. उद्धव ठाकरेंसोबत जे आमदार होते. त्यांनी स्पीकरच्या इलेक्शनमध्ये व्हीप पाळला नाही, म्हणून अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. तीही मान्य केली नाही. त्यांनाही पात्र ठरवलं आहे. याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाची गाईडलाईन बदललण्यात आली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जायला उद्धव ठाकरे यांना चांगली केस आहे, असंही ते म्हणाले.