झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना… शरद पवार साई चरणी लीन होताच कुणाची टोलेबाजी?
Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवशी शिबीर शिर्डीत झाले. या शिबिरादरम्यान शरद पवार यांनी शिर्डीतील साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे होत्या. शरद पवार यांनी साईबाबांचे दर्शन घेताच आनंद दवे यांनी त्यांच्या वक्तव्याची आठवण करु दिली आहे.
योगेश बोरसे, पुणे, दि. 5 जानेवारी 2024 | “पूजा-अर्चा ज्या ठिकाणी होते तिथे मी सहसा जात नाही. देव धर्म, पूजा-अर्चना यापासून मी जरा बाजूलाच असतो,” असे दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. यावेळी श्रद्धा हा प्रत्येकाची वैयक्तिक विषय आहे. त्याला माझा विरोध नाही, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार शिर्डीत आले. साईबाबांच्या चरणी लीन झाले. मग शरद पवार यांना घेरण्याची संधी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सोडली नाही. ‘झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना आत्ता प्रत्येक मंदिरी’ अशी मोजक्या शब्दांत त्यांना शरद पवार यांना उत्तर दिले.
शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी घेतले दर्शन
शरद पवार हे काही दिवसांपूर्वी पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गेलो होतो. यावेळी त्यांनी बाहेरुनच दर्शन घेतले होते. त्याची चर्चा झाली होती. त्यानंतर आता अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावर शरद पवार बोलले. अयोध्येत राम मंदिर होत आहे, त्याचा आनंद आहे. पण आपण मंदिरात जात नाही, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या मंथन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी शरद पवार साई दरबारी गेले. कार्यक्रमस्थळी रवाना होण्यापूर्वी शरद पवार साईंचरणी लिन झाले. यावेळी त्यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे , आ.जयंत पाटील होते. त्यासंदर्भातील बातम्या आल्यानंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले आनंद दवे
झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना आत्ता प्रत्येक मंदिरी. शरद पवार यांना साई मंदिरात पाया पडताना पाहून कृत्य कृत्य झालो, असे आनंद दवे यांनी शरद पवार यांच्या शिर्डीच्या दर्शनावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, एक दिवस हिंदू मतांसाठी राजकारणी कोटा बाहेर जानवे घालतील हे सावरकर वाक्य पुन्हा खरे ठरले. हा बदल चांगला आहे. यावेळी दवे यांनी मी मंदिरात जात नाही पासून ते निवडणूक काळात एकाच मंदिरात जातो, असे पवार यांनी म्हटलेल्या वाक्याची आठवण करुन दिली.
राज ठाकरे यांनी काढला होता मुद्दा
मनसे नेते राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नास्तिक असल्याचे एका भाषणात म्हटले होते. शरद पवार कधी देव वगैरे मानत नाहीत. त्यामुळे ते मंदिरात जात नाहीत, असे आरोप राज ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर राज ठाकरे यांना उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आली. शरद पवार यांचे बारामती येथील मारूती मंदिरातील फोटो शेअर करत राज ठाकरे यांचा दावा खोडला होता.