VIDEO : संजय राऊतांची भरसभेत घोडे लावण्याची भाषा, एक्सपर्ट असल्याचंही वक्तव्य, नेमकं काय घडलं?
शिवसेना नेते संजय राऊत रविवारी (26 सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्याच्या वडगाव शेरीत त्यांचं शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली.
पुणे : शिवसेना नेते संजय राऊत रविवारी (26 सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्याच्या वडगाव शेरीत त्यांचं शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी मंचावरुन विरोधी पक्षावर सडकून टीका केली. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. तसेच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. यावेळी राऊत यांनी घोडे लावण्याची देखील भाषा केली.
नेमकं काय घडलं?
संजय राऊत शिवसैनिक पदाविषयी भाष्य करत होते. यावेळी बोलत असताना ते वेगळ्या विषयाकडे गेले आणि नंतर कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला. “कुठलेही पद गेले तरी शिवसैनिक हे पद कुणी हिरावून घेणार नाही. अनेक राजकीय पक्षामध्ये त्या त्या पक्षाच्या प्रमुखांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अनेक पदं दिली असतील, अनेक राजकीय पक्षांनी पक्ष दलाल आणि एजंट निर्माण केले. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिक घडवला. पक्षात शिवसैनिक पद हे सर्वोच्च पद आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे, माझ्या पक्षामध्ये सर्वोच्च पद कुठलं असेल तर शिवसैनिक पद हे सर्वात मोठं असेल. म्हणून समोर बसलेले, मगाशी आपण म्हटलात ना, भाकरी फिरवायचे, घोडा फिरवायचा, घोड्यावर बसवायचंय. शिवसेना हा रेसचा घोडा आहे हे लक्षात घ्या”, असं संजय राऊत म्हणाले.
यावेळी कार्यकर्त्यांमध्ये कुणीतरी काहीतरी पुटपुटलं, त्यावेळी संजय राऊतांनी त्या कार्यकर्त्याला उत्तर देताना आपण लावायचं तेव्हा लावतोना घोडा. त्याबाबत मला सांगायला नको. त्यामध्ये मी एक्सपर्ट आहे. लोकं माझ्याकडून घोडे लावण्याचे धडे घेतात. मी सगळ्या प्रकारचे घोडे वापरलेले आहेत. कळलं का? मी घोडे लावले, पण घोड्यावर बसलो नाही, असं संजय राऊत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी सुरु केली. तसेच अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य आलं.
चंद्रकांत पाटलांनाही टोला
संजय राऊत यांनी भाषणावेळी चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला. “बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच शासकीय पद स्विकारलं नाही. त्यांना अनेक पदांची लालसा धरता आली असती. पण कोणत्याही पदावर बसलेले नसताना या देशाच्या सगळ्यात मोठा सत्ताधीश कोण असेल तर तो बाळासाहेब ठाकरे होता. त्यामुळे जे मंत्री, आमदार, खासदार होतात त्यांना सांगतो, हे काही नाही. पक्ष महत्त्वाचा, पक्षाचं संघटन महत्त्वाचं. मी कधीही केंद्रामध्ये संधी असताना मंत्री झालो नाही कारण मला ‘सामना’चं पद सोडावं लागेल. ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. जिथे पक्षाचं काम आहे तिथे मी काम करतो. मंत्रिपदं येतात आणि जातात. मग माजी, मला माजी म्हणू नका. आम्हाला कधी कोणी माजी म्हणणार नाही”, असं म्हणज राऊतांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.
‘खेडमध्ये आपले कार्यकर्ते जेलमध्ये सडत आहेत’
“हशा, टाळ्या खूप झाल्या. त्या पक्षाच्या मेळाव्यात आणि बैठकात होतच असतात. पुण्याची महागरपालिका आणि विधानसभाच्या पार्श्वभूमीवर संघटनेचं काम झालं पाहिजे. संघटना संघटनेच्या जागेवर, सरकार सरकारच्या जागेवर. प्रत्येकवेळी सरकार आणि मंत्री धावत येईल, असं नाही. मंत्री नीलम ताई पुण्यात असताना येऊ शकतात. राजकीय आणि संघटनेच्या लढाई या कधीही सरकारच्या बळावर लढता येत नाही. खेडमध्ये तर आमचे कार्यकर्ते अजूनही तुरुंगात आहेत. सरकार आहे पण आपले कार्यकर्ते जेलमध्ये सडत आहेत. सरकार असूनसुद्धा काढू शकत नाही आहोत. प्रत्येक गोष्टी जिंकत गेलं पाहिजे. आपल्याला जिंकण्याची सवय पाहिजे. ती जेव्हा आपल्या धमण्यांमध्ये येईल तेव्हा हा पक्ष आजपेक्षा शंभर पावलं पुढे जाईल”, असं देखील राऊत यावेळी म्हणाले.
पुण्याच्या कार्यकर्त्यांना आवाहन
“पुण्याच्या सर्व शिवसैनिकांना एकच सांगतो, आपण उद्धवजींकडे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पाहतो तेव्हा ते आपले पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख आहेत. जेव्हा ते या देशाचे पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनले तेव्हा शिवसेना हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमाकांचा पक्ष बनावा, ही आपली सर्वांची भूमिका आहे. महिला, विद्यार्थी, तरुण समाजाती सर्व घटकांना एकत्र घेऊन काम केलं पाहिजे. शिवसेना जातपात न बघणारी संघटना आहे. बाळासाहेबांनी कधीही कुणाची जात वाचून पद किंवा उमेदवार दिला नाही. अनेक वर्ष आम्हाला कुणाची जात काय हे कळलं नव्हतं. कुणाची जात काय काय हे माहिती नव्हतं. तसेच आम्ही धर्मही विचारला नाही. हा महाराष्ट्र आणि देश एक आहे या भावनेने बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारण केलं. तोच विचार आम्ही पुढे नेला”, असं राऊत म्हणाले.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले ते बघा :
हेही वाचा :