पुण्यात हाय-होल्टेज घडामोडी, संजय राऊत यांना पोलिसांनी तीन वेळा अडवलं, नेमकं काय घडलं?
संजय राऊत सभेला जाण्याआधी भीमा पाटस साखर कारखान्याकडे गेले. पण या दरम्यान पोलिसांनी संजय राऊत यांच्या ताफ्याला दोनवेळा अडवलं. त्यानंतर संजय राऊत भीमा पाटस साखर कारखान्याबाहेर दाखल झाले. पण पोलिसांनी त्यांना कारखान्यात जाऊ दिलं नाही.
पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यात त्यांची सभा आहे. दौंडमधील भीमा पाटस साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यानंतर राऊत यांची आज पुण्यात सभा होतेय. या सभेला जाण्याआधी राऊत भीमा पाटस साखर कारखान्याकडे गेले. पण या दरम्यान पोलिसांनी संजय राऊत यांच्या ताफ्याला दोनवेळा अडवलं. त्यानंतर संजय राऊत भीमा पाटस साखर कारखान्याबाहेर दाखल झाले. पण पोलिसांनी त्यांना कारखान्यात जाऊ दिलं नाही. पोलिसांनी एनओसी आणि जमावबंदीचं कारण सांगत कारखान्यात जाऊ दिलं नाही.
यावेळी राऊतांनी आपली भूमिका मांडली. “माझ्यासाठी कोणत्याही नोटीसची गरज नाही. तुम्ही राज्यसभेच्या सदस्याला अडवू शकत नाही. तुम्ही कारखान्याचे नोकर नाहीत तर सरकारचे नोकर आहात. तुम्ही आमच्याबरोबर राहा. नाहीतर तुमच्यावर हक्कभंग दाखल होणार”, असं संजय राऊत यांनी पोलिसांना सांगितलं.
‘तुम्ही मला अडवू शकत नाहीत’
“जातोय आतमध्ये, अडवतात कशासाठी? इथे काय दंगल होईल का? आम्ही अत्यंत शांतपणे कारखान्यात जाऊन संस्थापक मधुकररावांना श्रद्धांजली अर्पण करणार. मी खासदार आहे, तुम्ही मला अडवू शकत नाहीत. कलम 144 ठीक आहे. आम्ही आतमध्ये जातोय. ही जनतेची संपत्ती आहे. शेतकऱ्यांची संपत्ती आहे. ही हुकूमशाही आहे. तुम्ही सभासदालाच रोखताय”, असं संजय राऊत म्हणाले.
‘खासदारांना अडविण्यासाठी पोलिसांवर दबाव’
“याला हुकूमशाही आणि गुंडशाही म्हणतात. तशी गरज पडली तर गुंडशालाहीला गुंडशाहीने उत्तर दिलं असतं. मी खासदार आहे. मला हे आतमध्ये जाऊ देत नाहीत. मी पोलिसांवर हक्कभंग आणायला सांगणार आहे. खासदारांना अडविण्यासाठी पोलिसांवर दबाव आहे. याचा अर्थ या कारखान्यात घोटाळा आहे. तो घोटाळा तुम्ही लपवू इच्छित आहात. तुम्हाला कसली भीती वाटतेय? आमच्यासोबत या ना”, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी कारखाना परिसरात कारखान्याचे संस्थापक मधुकरराव शितोडे यांच्या पुतळ्याला संजय राऊत यांनी पुष्पहार अर्पण केला.
राऊतांची फडणवीसांवर जहरी टीका
दरम्यान, संजय राऊत यांनी आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. “देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून चोर-लंफगे निर्धास्त झाले आहेत. कारण गृहमंत्री फडणवीस हे चोर-लंफग्याचे सरदार झालेले आहेत. देवेंद्र फडणवीसांना कारखाना चालवण्यासाठी 36 कोटी दिले. कुठे गेलेत पैसे? खोटी हमीपत्र देवून कर्ज दिलंय. देवेंद्र फडणवीस पदावर बसायला लायक नाहीत. कुठली नशा करून फडणवीस पदावर बसले आहेत?”, असा सवाल संजय राऊतांनी केला.