पुणे : जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांनी आम्हाला फोन करून अजित पवार यांचा पुतळा जाळून टाकण्यास सांगितलं होतं. अजित पवार यांच्या पुतळ्याला जोडे मारा असं आम्हाला फोनवरून सांगण्यात आलं होतं. राष्ट्रवादीनेच अजितदादांच्या बदनामीचा कट रचला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे. म्हस्के यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. त्यावर आता जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांनी गुंडांवर बोलूच नये. त्यांच्यासोबत फक्त तेच लोक फिरतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलून संजय राऊत मातोश्रीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली. निवडणुकीनंतर पुण्यात ठाकरे गटात भूकंप होणारच आहे. ठाकरे गटातील सर्व नेते शिवसेनेत येतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा त्यांनी केला.
यावेळी त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावरही टीका केली. आपण एखाद्या व्यक्तीला वरिष्ठ मानत असू तर त्यांना पितृतुल्य मानतो ना. अंधारे मॅडम यांचं उद्धव ठाकरेंबाबत काय मत आहे? याच सुषमा अंधारे बाळासाहेब ठाकरे यांना म्हातारा म्हणाल्या होत्या. ही त्यांची संस्कृती आहे. उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना खांद्यावर घ्यावं असंही त्या म्हणाल्या होत्या. आता त्यांची ही विधाने बदलली काय? असा सवाल त्यांनी केला.
संजय राऊत यांनी आरोप केला. त्यांनी पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांना पत्र दिलं. त्यांनी चौकशीची मागणी केली. ठाणे पोलीस त्यांचा जबाब घेत आहेत. यावेळी राऊत यांनी आपल्या बिनबुडाच्या आरोपावरून घुमजाव केलं आहे. कबड्डी स्पर्धेच्यावेळी माझ्या अंगावर शाई फेकणार होते. काळे फासणार होते, असं आता राऊत जबाबात सांगत आहेत. त्यांना हे सगळं कसं कळालं हे राऊत यांनी सांगावं.
तुम्हाला धमकीचा फोन आला असेल तर सांगावं. राऊत यांनी आपल्या जबाबावेळी कोणताही पुरावा दिला नाही. त्यांनी पुरावा द्यावा. हवेत बोलू नये. एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचं काम राऊत करत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्याचं काम करत आहेत. संतापलेले शिवसैनिकच एक दिवस संजय राऊत यांना चोपून काढतील, असा इशाराच त्यांनी दिला.
संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे. राऊत यांच्यामुळेच उद्धव ठाकरे यांचं मोठं नुकसान झालं आहे. हे आता सगळ्यांना कळून चुकलं आहे. राऊत यांच्यामुळेच आनंद दिघे यांना टाडा लागला होता. तुम्ही मर्द आहात तर गुंड घेऊन का फिरता?, असा सवाल त्यांनी केला.
संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. श्रीकांत शिंदे आजारी आहेत, त्यामूळे ते यावर बोलणार नाहीत. बदनाम करणं हा संजय राऊत यांचा डाव आहे. ही लिहिली गेलेली स्क्रिप्ट आहे. राऊत यांनी दोन हजार कोटी रुपयांचा आरोप केला. त्याचीही चौकशी होणार आहे. यावर निवडणूक आयोगच निर्णय घेईल.
ठाकरे यांच्या सोबत जे आहेत त्यांना फोडण्यासाठी पैसे देण्याची गरज नाही. त्यांच्याकडे संजय राऊत नावाचा कार्ड आहे. लोक आपोआप आमच्याकडे येतील, असा चिमटा त्यांनी काढला. शरद पवार यांनी संजय राऊत यांना शिवसेना संपवण्याची सुपारी दिली आहे, असा आरोपही त्यांनी केला.