Sanjay Pawar : …तर राजेंच्याविरोधात लढणार, संजय पवारांची पुण्यात घोषणा; राज्यसभा उमेदवारीवर थेट प्रतिक्रिया
राज्यसभेच्या उमेदवारीवरून सध्या कोल्हापुरातील शिवसेनेचे नेते संजय पवार यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र त्यांच्यापर्यंत कोणतीही माहिती यासंदर्भात पोहोचवण्यात आलेली नाही. मात्र आपल्याला उमेदवारी मिळाली तर आनंद होईल, अशी प्रतिक्रिया संजय पवार दिली आहे.
कोल्हापूर : राज्यसभेची (Rajya sabha) उमेदवारी मिळाली तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे कोल्हापुरातील नेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. राज्यसभेचा शिवसेनेचा उमेदवार कोण हे अद्याप ठरलेले नाही. मात्र कालपासून संजय पवार यांचे नाव चर्चेत आहे. ते पुण्यात आले असता त्यांना याविषयी विचारले, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या उमेदवारीची (Candidacy) चर्चा ही माध्यमांमधूनच ऐकत आहे. सध्या शिवाजीराव आढळराव पाटील, उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत खैरे यांची नावे आहेत. त्याचप्रमाणे आपलेही नाव चर्चेत असल्याचे ऐकत आहे, असे ते म्हणाले. यासंदर्भात वरिष्ठांकडून किंवा मुंबईतून अद्याप अधिकृत काहीही माहिती माझ्यापर्यंत आलेली नसल्याचे तसेच कोणाचाही फोन आला नसल्याचेही ते म्हणाले आहेत.
‘बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत’
राज्यसभेच्या उमेदवारीवरून सध्या कोल्हापुरातील शिवसेनेचे नेते संजय पवार यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र त्यांच्यापर्यंत कोणतीही माहिती यासंदर्भात पोहोचवण्यात आलेली नाही. मात्र आपल्याला उमेदवारी मिळाली तर आनंद होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. साधारणपणे 30 वर्षे शिवसेनेत काम करतो. यादरम्यान अनेक चढ-उतार शिवसेनेत पाहिले. मात्र कोणते पद मिळावे म्हणून कधीच काम केले नाही किंवा तशी मागणीही कधी केली नाही, असे ते म्हणाले. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत असल्याचेही ते म्हणाले.
‘काम पाहूनच मिळते संधी’
तीनवेळा नगरसेवक, 14 वर्ष जिल्हाप्रमुख तसेच शहरप्रमुख, तालुकाप्रमुख म्हणून काम पाहत आहे. म्हणजे अगदी सुरुवातीपासून शिवसेनेत काम केले आहे. त्यामुळे सर्वसामान्याला उच्च पदावर नेणारा असा हा पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या मनात काही असेल तर ते देतील. नाही दिले तरी शिवसैनिक म्हणून काम करण्याची कायम तयारी आहे, असे संजय पवार म्हणाले. तर संधी मिळाली तर त्याचे सोने करणार. पक्षात मागून काही मिळत नसते. काम पाहूनच संधी दिली जाते. त्यानंतर मातोश्री ठरवते, अशापद्धतीने काम चालते, असे ते म्हणाले.
काय म्हणाले संजय पवार?
‘संभाजीराजे आदरणीय कुटुंब’
संभाजीराजेंविषयी मी बोलणार नाही. ते आमचे राजे आहेत. ते कोल्हापुरातील आदरणीय कुटुंब आहे. त्यांच्यातील कोणीही सदस्य असेल तर संजय पवार त्यांच्या पाया पडतो. ही शिवसैनिकाला दिलेली शिकवण आहे. त्यामुळे राजेंना शह वगैरे असे काही नाही. मी एक साधा शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे यांनी लढायला सांगितले तर लढणार, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, भेटायला बोलावले तर नक्की जाणार, असे ते म्हणाले.