अमित शाह यांच्या शिवाजी महाराजांवरील पुस्तकात काय असणार?
अमित शाह यांच्यासंदर्भात अनेक लोकांना माहीत नाही. अमित शाह हे शिवप्रेमी आहेत. शाह यांनी मराठ्यांचा आणि छत्रपती शिवराय यांचा दांडगा अभ्यास केला आहे.
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांच्या हस्ते पुण्यातील शिवसृष्टीच्या (shivsrushti pune) पहिल्या टप्प्याचं उद्घाटन रविवारी झाले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेमधून साकारण्यात आलेली ही शिवसृष्टी चार टप्प्यात उभारण्यात येत आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण शिवजयंतीनिमित्त रविवारी करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांनी अमित शाह यांच्याबद्दल बोलताना मोठी माहिती दिली.
अमित शाह लिहिणार पुस्तक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अमित शाह यांच्यासंदर्भात अनेक लोकांना माहीत नाही. अमित शाह हे शिवप्रेमी आहेत. शाह यांनी मराठ्यांचा आणि छत्रपती शिवराय यांचा दांडगा अभ्यास केला आहे. या विषयावर ते एक पुस्तक लिहित आहे. या पुस्तकासाठी त्यांनी लंडनवरुन काही सामग्री मागवली आहे. जगात व देशात जेथे जेथे शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, ते सर्व मिळवण्याचा प्रयत्न अमित शाह करत आहेत. यामुळे लवकरच अमित शाह यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत जे काम केले, त्याचे परिमाण देशात अनेक वर्षांपर्यंत राहिले. अजून त्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. शिवाजी महाराजांकडे मोठी दूरदृष्टी होती. त्यांनी ज्या पद्धतीने विचार केला ते सामान्य माणसांचे काम नाही. त्यांच्याकडे दैवी शक्तीच होती, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
गुजरातमध्ये जाणता राजा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी जाणता राजा नाटकाचे 8 प्रयोग झाले. त्यावेळी गुजरातचे लोक नाटक बघायला येत होते आणि शिवाजी महाराजांचे भक्त होऊन जात होते.
शिवसृष्टी आशियातील सर्वात मोठे थीम पार्क होणार आहे शिवसृष्टीतून शिवाजी महाराजांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत जाणार आहे. शिवसृष्टीतून इतिहासाला उजाळा मिळेल. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील इतिहास प्रेमींसाठी हे महत्त्वाचं स्थळ ठरेल, असं अमित शाह म्हणाले.
बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घराघरात पोहोचवण्याचं काम केलं. शिवसृष्टीची निर्मिती व जाणता राजा महानाट्यामुळे बाबासाहेब पुरंदरे यांनी देशावर खूप मोठे उपकार केले आहेत. या लोकापर्ण सोहळ्यात मी सहभागी झालो, यामुळे स्वतःला भाग्यवान समजतो. या ठिकाणी येणारा प्रत्येकजण शिवाजी महाराजांचा एक संदेश घेऊन जाणार आहे. शिवाजी महाराज ही एक व्यक्ती नसून एक विचार आहे, असं अमित शाह यांनी सांगितलं.