गारपीट, अवकाळीनंतर बळीराजापुढे पुन्हा संकट, आता स्कायमेटच्या अंदाजाने वाढवली चिंता
यंदाच्या मान्सूनसंदर्भात पहिला अंदाज आला आहे. परंतु हा अंदाज शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे. स्कायमेटने 2023 चा मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसाल यंदा एल निनोचा प्रभाव मान्सूनवर असणार आहे. यामुळे यंदा सामान्यापेक्षा कमी पाऊस पडणार आहे.
पुणे : मार्च आणि एप्रिल महिन्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आला आहे. हातात आलेले पीक अवकाळी पावसामुळे गेले आहे. शेतकरी आता राज्य सरकारकडून मदतीची प्रतिक्षा करत आहे. परंतु आता स्कायमेट या संस्थेने केलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा देशात मान्सून कसा असणार आहे? मान्सूनबाबतचा पहिला अंदाज स्कायमेटकडून आला आहे. स्कायमेट ही खाजगी हवामान अहवाल देणार्या संस्था आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्कायमेटकडूनही हवामानाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यामुळे चिंता वाढली
स्कायमेटने आता 2023 चा मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. स्कायमेटच्या मते, यंदा मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. पहिल्या अंदाजात पाऊस सामान्यपेक्षा कमी असू शकतो. सामान्य पावसाची केवळ 25 टक्के शक्यता आहे. यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. दीर्घ कालावधीनंतर सरासरीच्या ९४ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे.
का पडणार कमी पाऊस
अल निनोमुळे मान्सून कमकुवत होण्याची शक्यता आहे. पॅसिफिक महासागरातचा पृष्ठभाग जेव्हा गरम होतो, तेव्हा अल निनोचा परिणाम होतो. याचा परिणाम नैऋत्य मान्सूनवर होतो. अंदाजानुसार, मे-जुलै दरम्यान अल निनोचा प्रभाव परत येऊ शकतो. जून ते सप्टेंबरपर्यंत देशात मान्सूनही पूर्णपणे सक्रिय होतो. स्कायमेटच्या अंदाजानुसार अल निनोमुळे दुष्काळ पडण्याचीही शक्यता आहे.
महाराष्ट्रात काय परिस्थिती
एल निनोमुळे यंदा मान्सूनवर कमी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात मान्सून कमी असणार आहे. तर पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सामान्य सरासरीपेक्षा कमी मान्सून पाऊस पडेल.
यापूर्वी काय झाले
1997 मध्ये पाऊस सामान्यपेक्षा जास्त होता. त्यावेळीही अल निनोचा प्रभाव होता. एल निनोचा प्रभाव असताना कमी पाऊस पडतो, परंतु 1997 मध्ये हे खोटे ठरले. तसेच 2004 मध्ये अल निनो कमकुवत असूनही चांगला पाऊस पडला होता.
अल निनो म्हणजे काय?
अल निनो हा जलवायू प्रणालीचा एक भाग आहे. हवामानावर त्याचा परिणाम होतो. अल निनोची परिस्थिती साधारणपणे दर तीन ते सहा वर्षांनी उद्भवते. पूर्व आणि मध्य विषुववृत्ताला प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावर पाणी सामान्यापेक्षा गरम होते तेव्हा त्याला अल निनो म्हणतात. एल निनोच्या या परिस्थितीमुळे वाऱ्याची पद्धत बदलते आणि त्यामुळे जगाच्या अनेक भागांमध्ये हवामानावर परिणाम होतो.
यापुर्वी कधी होता अल निनो
यापुर्वी २००४, २००९, २०१४ व २०१८ मध्ये अल निनोचा अंदाज होता. या सर्व वर्षांत देशात दुष्काळ पडला.तोच अंदाज २०२३ मध्ये आहे.