सागर सुरवसे, सोलापूर : अधिकारी काय करतील, याचा काही नेम नाही. आपण किती कर्तव्य तत्पर आहोत, हे दाखवण्यासाठी काही करु शकतात. सोलापूर जिल्ह्यातील नगर परिषदेमधील अधिकाऱ्याने चक्क तीन शाळांना कुलूप ठोकले. मग काय शिक्षकांनी आपला फंडा वापरला अन् या मुलांची शाळा अधिकाऱ्याच्या कार्यालयात भरवली. शिक्षणाच्या आईचा घो करणाऱ्या या अधिकाऱ्याचे काय करावे, असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे. दरम्यान शाळेला कुलूप ठोकणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणीही केली जात आहे.
काय आहे विषय
सोलापुरात अक्कलकोट तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी मैंदर्गी नगरपरिषदेच्या सीईओ कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. मैंदर्गी नगर परिषदेने कर भरला नसल्याच्या कारणावरुन जिल्हा परिषदेच्या तीन शाळांना कुलूप ठोकले आहे. ऐन परीक्षेच्या काळात शाळेला कुलूप ठोकल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक संतप्त झालेत. संतप्त झालेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेतून घेऊन नगरपरिषदेपर्यंत मोर्चा काढत सीईओच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरु केले आहे. जिल्हा परिषदेच्या तीन शाळांनी कर थकवल्याने नगर परिषदेच्या सीईओंच्या या कर्तव्य तत्परतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल केला जात आहे.
ही कोणती पद्धत
शाळा सरकारी अन् नगरपरिषद सरकारी. दोन विभागाच्या या भांडणाचा भुर्दंड विद्यार्थ्यांना का बसतो? असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे या प्रकरणी शाळेला कुलूप ठोकण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
परीक्षाचा काळ आला असताना कारवाई
मार्च महिन्यात परीक्षांना सुरुवात होत असते. परीक्षांचा कालावधी जवळ आला असताना शाळेला कुलूप ठोकून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले गेले आहे. अनेक शासकीय कार्यालयांची थकबाकी असते, श्रीमंत व बडे प्रस्थ असलेले लोकही आपली थकबाकी भरत नाही, परंतु त्यांच्यांवर कारवाई करण्याची हिंमत अधिकारी दाखवत नाही. अधिकाऱ्यांच्या या वागणुकीबद्दल पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश कधी मिळणार? असा प्रश्न पालक आणि शिक्षकांच्या मनात आहे.