BREAKING : पुण्यात एसपी कॉलेजच्या बाहेर तणावाचं वातावरण, घडामोडींना वेग, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात एसपी कॉलेज बाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालंय. कारण पुरोगामी विचारांच्या संघटना एसपी कॉलेजच्या बाहेर एकवटले आहेत.
अभिजीत पोटे, पुणे : पुण्यात एसपी कॉलेज बाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालंय. कारण पुरोगामी विचारांच्या संघटना एसपी कॉलेजच्या बाहेर एकवटले आहेत. एसपी कॉलेजमध्ये पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी काही संघटनांचे कार्यकर्ते एसपी कॉलेजबाहेर एकत्र आले आहेत. त्यांच्याकडून पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला विरोध केला जातोय. त्यामुळे घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. घटनास्थळी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जातेय. तर आंदोलकांकडून पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला विरोध होतोय.
एसपी कॉलेजमध्ये ‘कर्नल पुरोहित द मॅन बेट्रेड’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आलाय. याच पुस्तकाला आंदोलकांचा विरोध आहे. त्यासाठीच एसपी कॉलेज बाहेर पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी आंदोलन केलं जातंय.
“कर्नल पुरोहित 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेकजण जखमी झाले होते. या प्रकरणी कर्नल पुरोहित यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत”, असा आरोप पुरोगामी संघटनांनी केलाय.
एकीकडे एसपी कॉलेजबाहेर पुस्तक प्रकाशनाला विरोध होत असला तरी आयोजक पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी आग्रही आहेत. पुरोगामी संघटनांचा विरोध झुगारुन पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होणारच असल्याची माहिती समोर येतेय.
संबंधित पुस्तकाचं प्रकाशन हे जयंत उमराणीकर, सत्यपाल सिंग याच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे पुस्तक प्रकाशन सोहळ्याला शरद पोंक्षे यांची देखील उपस्थिती राहणार आहे.
दरम्यान, कार्यक्रमस्थळी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. विशेष म्हणजे पुणे पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल स्वतः कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत.
हे पुस्तक लेखीका स्मिता मिश्रा यांनी लिहिलं आहे. हे पुस्तक कर्नल पुरोहित यांच्यावर लिहिलं गेलंय.
दुसरीकडे हिंदू महासंघ कर्नल पुरोहित यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलाय. हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी कर्नल पुरोहित यांच्या पुस्तकाचं समर्थन केलंय.