मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, राज्य मागासवर्ग आयोगाने घेतला हा निर्णय
rajya magasvargiya aayog : राज्य मागसवर्गीय आयोगाची बैठक पुणे येथे झाली. या बैठकीत सर्वच जातींचे मागासलेपण तपासण्याचा निर्णय घेण्यात आल्याची बातमी आली होती. परंतु आता मागसवर्गीय आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सर्वच जातीचे आरक्षणासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. परंतु...
प्रदीप कापसे, पुणे दि. 25 नोव्हेंबर 2023 | राज्यात मराठा आरक्षणासाठी प्रक्रिया वेगाने सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर विविध पातळयांवर मराठा समाजास आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी कामकाज सुरु झाले आहे. परंतु मागासवर्गीय आयोग केवळ मराठाच नाही तर सर्व जातींचे सर्वेक्षण करणार असल्याची बातमी आली होती. त्यासंदर्भात आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांची ‘टीव्ही ९ मराठी’ला माहिती दिली. यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी मान्य केले. परंतु राज्य मागासवर्ग आयोग फक्त मराठा समाजाच सर्वेक्षण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयोगाचे काम सुरु असताना मराठा आरक्षणासाठी राज्यस्तरावर कुणबी नोंदणी तपासण्याचे कामही सुरु आहे.
काय झाली बैठकीत चर्चा
राज्य मागासवर्ग आयोगाची पुणे येथे बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे होते. या बैठकीला समाजशास्त्रज्ञ अंबादास मोहिते, सदस्य चंद्रलाल मेश्राम, बालाजी सागर किल्लारीकर, डॉक्टर संजीव सोनवणे, गजानन खराटे, निलीमा सरप लखाडे, गोविंद काळे, लक्ष्मण हाके, ज्योतीराम चव्हाण, सदस्य सचिव आ.उ.पाटील उपस्थित होते. बैठकीत सर्व जातीचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु यासंदर्भात बैठकीत फक्त चर्चा झाली. निर्णय झालेला नाही. बैठकीत चर्चा होणे आणि निर्णय होणे यामध्ये फरक आहे. केवळ फक्त मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाल्याचे आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी सांगितले.
मराठा समाजाचेच सर्वेक्षण करणार
ओबीसी समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. तसेच इतर समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी ठराव करणे गरजेच आहे. परंतु राज्य मागासवर्ग आयोगाने तसा कोणताही ठराव केलेला नाही. यामुळे फक्त मराठा समाजाचे मागासलेपण तपासाले जाणार असल्याचे आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी स्पष्ट केले. बैठकीत सगळ्या समाज घटकाचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी काही सदस्यांनी केली. मात्र तसा निर्णय झालेला नाही, असे त्यांनी सांगितले. मराठा समाजाचे सर्वेक्षणाचे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.