Pune Hyena : तीस फूट खोल विहिरीत कोसळले पट्टेदार तरस; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर जुन्नरमध्ये वनविभागानं केली सुटका
संबंधित विहीर वनक्षेत्राच्या परिघात आहे. याठिकाणी तरसासह अनेक वन्य प्राण्यांचे निवासस्थान आहे. सहज उपलब्ध शिकार आणि निवारा शोधण्यासाठी हे प्राणी अनेकदा मानवी वस्तीत प्रवेश करतात, असे वाइल्डलाइफ एसओएस या संघटनेने म्हटले आहे.
पुणे : पुण्याजवळील एका गावातील 30 फूट खोल विहिरीतून एका पट्टेदार तरसाची (Hyena) शनिवारी दोन तास चाललेल्या ऑपरेशननंतर सुटका करण्यात आली. पट्टेदार तरस ही भारतीय उपखंडात आढळणारी एकमेव तरसाची प्रजाती आहे. हे वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत संरक्षित आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) रेड लिस्टमध्ये ‘जवळपास धोक्यात’ म्हणून वर्गीकृत, तरसाची जागतिक लोकसंख्या 10,000पेक्षा कमी असल्याचा अंदाज आहे. पुण्याजवळील जुन्नर विभागातील बुचकेवाडी गावातील रहिवासी आपल्या विहिरीचे (Well) पाणी काढण्यासाठी पंप चालू करण्यासाठी पहाटे बाहेर पडले होते. पण जवळपास 30 फूट खोल विहिरीत पडलेल्या पट्टेदार तरसाला पाहून त्यांना धक्काच बसला. नंतर वनविभागाला कळवण्यात आले. प्राण्यांशी संबंधित संघटना नंतर तरसाच्या बचावकार्यात सहभागी झाल्या. हे एक मादी तरस असल्याची माहिती देण्यात आली.
शिकारीसाठी मानवी वस्तीत प्रवेश
ही विहीर वनक्षेत्राच्या परिघात आहे. याठिकाणी तरसासह अनेक वन्य प्राण्यांचे निवासस्थान आहे. सहज उपलब्ध शिकार आणि निवारा शोधण्यासाठी हे प्राणी अनेकदा मानवी वस्तीत प्रवेश करतात, असे वाइल्डलाइफ एसओएस या संघटनेने म्हटले आहे. या घटनेविषयी राज्याच्या वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यांनी वाइल्डलाइफ एसओएस या प्राण्यांच्या बचावासाठी काम करणाऱ्या संस्थेमध्ये सहभाग घेतला. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्राच्या बाहेर कार्यरत असणारी चार सदस्यीय वन्यजीव एसओएस टीम नंतर लवकरच रेस्क्यू गियर आणि ट्रॅप पिंजरा घेऊन घटनास्थळी आली.
शरीरावर किरकोळ ओरखडे
टीमने विहिरीत एक पिंजरा सोडला. काही तासांच्या प्रयत्नांनंतर तरसाने त्यात प्रवेश केला. सुरक्षितपणे तो आत गेल्यावर पिंजरा काळजीपूर्वक बाहेर काढत तरसाची सुटका करण्यात आली. त्यानंतर शेजारच्या जंगलात त्याला सोडण्यात आले. सोडण्यात आलेले तरस मादी प्रजातीचे आहे. तिच्या शरीरावर किरकोळ ओरखडेही दिसून आले. कोणतीही मोठी जखम न झाल्याने आणि प्राणी तंदुरुस्त असल्याने आम्ही तिला लवकरच जंगलात सोडले, असे वाइल्डलाइफ SOSचे पशुवैद्यकीय अधिकारी निखिल बांगर यांनी सांगितले.
उघड्या विहिरींचा धोका
जुन्नरचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर अजित शिंदे म्हणाले, की गावाभोवतीच्या खुल्या विहिरीचा धोका या वन्यप्राण्यांना नेहमीच असतो. मात्र संकटात पडलेल्या अशा प्राण्यांना वाचवताना कोणतीही मदत करण्यासाठी आमची टीम नेहमीच दक्ष असते.