पुण्यातील आरोग्य संचलनालयासमोर बेमुदत उपोषण, पेपर न फुटलेल्या विषयांचा निकाल लावण्याची मागणी
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या आरोग्य भरतीच्या गट 'क' आणि गट 'ड' परीक्षेचा पेपर फुटला होता. याला पाच महिने उलटल्यानंतरदेखील या परीक्षा देणाऱ्या तब्बल आठ लाख विद्यार्थ्यांना आपले काय होणार, या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. आरोग्य सेवेची ही परीक्षाच रद्द करून ती नव्याने राबवण्याची मागणी काही विद्यार्थी करत आहेत.
पुणे : आरोग्य भरतीच्या (Health department) पेपर फुटीला पाच महिने उलटून गेले आहेत. मात्र ना या परीक्षेचा निकाल लावण्यात आला ना ही परीक्षा (Exam) रद्द करण्यात आली. त्यामुळे आठ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्यामुळे राज्यभरातून एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील आरोग्य संचलनालयासमोर बेमुदत उपोषण (Fasting) सुरू केले आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या आरोग्य भरतीच्या गट ‘क’ आणि गट ‘ड’ परीक्षेचा पेपर फुटला होता. याला पाच महिने उलटल्यानंतरदेखील या परीक्षा देणाऱ्या तब्बल आठ लाख विद्यार्थ्यांना आपले काय होणार, या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. आरोग्य सेवेची ही परीक्षाच रद्द करून ती नव्याने राबवण्याची मागणी काही विद्यार्थी करत आहेत. त्यांच्या काही मागण्या आहेत.
बेमुदत उपोषण
ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत, ते विद्यार्थी संपूर्ण परीक्षा रद्द न करता ज्या विषयांचे पेपर फुटलेले नाहीत, त्या विषयांचा निकाल लावण्याची मागणी करत आहेत. अशा विद्यार्थ्यांनी आजपासून पुण्यातील आरोग्य संचलनासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
काय आहे प्रकरण?
31 ऑक्टोबर 2021ला आरोग्य विभागाच्या गट कची परीक्षा झाली होती. त्यापूर्वी 24 ऑक्टोबरला गट क ची परीक्षा झाली होती. आरोग्य भरती, म्हाडा परीक्षा पेपर फुटी आणि टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी एकूण 25 आरोपी अटकेत आहेत. तिन्ही परीक्षा संदर्भात एकमेकांशी घोटाळ्यात ते सहभागी आहेत, अशी माहिती समोर आली होती.