अतिवृष्टीची ६७५ कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात, कोणाला कशी मिळेल मदत वाचा
दहा जिल्ह्यातील ६ लाख ३२ हजार ८९३ शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या भरपाईपोटी लवकरच मिळणार आहे. या शेतकऱ्यांना ६७५ कोटी ४५ लाख १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या भरपाईच्या रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.
पुणे : Pune News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. राज्यातील दहा जिल्ह्यातील ६ लाख ३२ हजार ८९३ शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या भरपाईपोटी लवकरच मिळणार आहे. या शेतकऱ्यांना ६७५ कोटी ४५ लाख १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या भरपाईच्या रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.
राज्यात परतीच्या पावसादरम्यान अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक अतिवृष्टीमुळे नष्ट झाले होते. अतिवृष्टीचे पंचनामे करुन मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. जिरायतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदतीची घोषणा झाली होती. बागायतीसाठी २७ हजार रुपये तर बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय झाला. ही मदत तीन हेक्टरपर्यंत मर्यादेत देण्याचा निर्णय झाला.
कशी मिळाली मदत : राज्यातील शेतकऱ्यांना जून ते ऑक्टोबर या काळातील अतिवृष्टीची ५ हजार ६६१ कोटी ३९ लाखांची मदत दिली गेली आहे. परंतु सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पुन्हा अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीसंदर्भातील मदतीचा प्रस्ताव पुणे व नाशिक विभागीय आयुक्तालयाकडून सरकारला पाठवण्यात आला होता. त्यावर राज्य सरकारने बुधवारी मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे आणि नाशिक दहा जिल्ह्यातील सव्वासहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आता मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ही रक्कम थेट वर्ग केली जाणार आहे.
मदत केली दुप्पट :
महसूल आणि वन विभागाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत दुप्पट वाढ केली आहे. शेतकऱ्यांना आता 3 हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात आतापर्यंत जिरायतीच्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना 6 हजार 800 रुपये प्रती हेक्टर मदत मिळत होती. पण आता हीच मदत 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर इतकी मिळणार आहे.