pune lok sabha | पुणे लोकसभेसाठी भाजपच्या या उमेदवाराने केली तयारी सुरु, गाठीभेटी अन्…
pune lok sabha | पुणे लोकसभा मतदार संघासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. आता या मतदार संघात पोटनिवडणूक होणार नाही, हे निश्चित झाले. त्यानंतर 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
अभिजित पोते, पुणे | 12 ऑक्टोंबर 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यातील निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. या पाच राज्यातील निवडणुकीस लोकसभेची सेमीफायनल म्हटली जात आहे. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपसह इतर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच सरळ लढत होणार असल्याची शक्यता आहे. महायुतीचा घटकपक्ष असलेल्या भाजपने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
पुणे येथून महायुतीतून कोण लढणार
लोकसभेची निवडणूक पुणे लोकसभा मतदार संघातून महायुतीतून कोण लढवणार हे निश्चित झालेले नाही. महायुतीत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आला आहे. तसेच भाजपसोबत शिवसेनाही आहे. पुणे येथील जागेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दावा केला जाणार नाही. परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून दावा केला जाणार असल्याची शक्यता आहे. त्याचवेळी आता भाजप उमेदवाराने तयारी सुरु केली आहे.
कोण आहे भाजपचा उमेदवार
लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदार संघातून अनेक नावांची चर्चा झाली. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव चर्चेत आले आहेत. मुरलीधर मोहोळ, संजय काकडे, गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट यांच्यासह इतरांची नावे चर्चेत आहे. परंतु भाजपने सुनील देवधर यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील देवधर यांनी तयारी सुरु केली आहे. त्यांनी मतदारसंघातील नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
आमदारांच्या गाठीभेटी झाल्या, आता…
त्रिपुरामध्ये भाजपला सत्ता मिळवून देण्यात सुनील देवधर यांचा वाटा मोठा आहे. अडीच दशक डाव्यांच्या प्रभाव त्यांनी संपुष्टात आणला. पुण्यात त्यांचा जन्म झाला. संघाचे प्रचारक म्हणून सुनील देवधर यांनी ईशान्य भारतात एक तप म्हणजे १२ वर्ष काम केले.आता पुणे लोकसभा ते लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातील आमदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. तसेच लवकरच शहरातील विरोधी पक्षातील आमदारांच्या भेटी घेणार आहे.