धक्कादायक, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भानामती, उमेदवारांच्या फोटोंवर…
grampanchayat election maharashtra 2023 | राज्यातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी प्रचार तोफा शुक्रवारी संध्याकाळी थंडावल्या. या ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान होणार आहे. सोमवारी निकाल येणार आहेत.
सुनिल थिगळे, नारायणगाव, पुणे | 4 नोव्हेंबर 2023 : राज्यातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी प्रचार तोफा शुक्रवारी संध्याकाळी थंडावल्या. त्यानंतर दोन दिवस गावपातळीवरील रणनीती ठरवली जाणार आहे. विजयाचे आरखडे बांधले जाणार आहेत. त्यानंतर रविवारी मतदान होणार आहे आणि सोमवारी निकाल येणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर नारायणगावात भानामतीचा प्रकार उघड झाला आहे. उमेदवारांच्या फोटोवर बाहुली लावण्यात आली. त्यानंतर लिंबू आणि टाचण्या टोचल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणी होत आहे.
भर वस्तीत फोटोला लिंबू टाचण्या
नारायणगाव शहरातील भर वस्तीत फोटोसह लिंबू टाचण्या आढळल्या आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे. उमेदवारांच्या फोटोवर बाहुली लावली आहे. त्यानंतर लिंबू आणि टाचण्या टोचल्या गेल्या आहेत. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत तरुण आणि उच्च शिक्षित उमेदवार वाढले आहे. त्यांनी विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. परंतु त्याचवेळी काही जण अंधश्रद्धेतून असा प्रकार करत आहे. यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नारायणगावात सरपंचपदासाठी थेट लढत
नारायणगाव ग्रामपंचायतीत १७ जागा आहेत. एकूण सहा प्रभागातून ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तसेच सरपंच पदासाठी पाच उमेदवार होते. त्यापैकी तिघांनी माघार घेतल्यामुळे दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे. नारायणागावमधील निवडणुकीत श्री मुक्ताई हनुमान ग्रामविकास पॅनलकडून श्री मुक्ताई-हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनलला टक्कर दिली जाणार आहे. सरपंच पदासाठीही हे दोन्ही पॅनलमध्येच लढत होत आहे.
नारायणगाव महत्वाची बाजारपेठ
पुणे जिल्ह्यात नारायणगाव महत्वाची बाजारपेठ आहे. त्यामुळे याठिकाणी ग्रामपंचायत महत्वाची आहे. नारायणगाव निवडणूक अटीतटीची होणार आहे. दोन्ही गटाच्या उमेदवारांनी प्रचार दरम्यान आपआपली बाजू भक्कम मांडली आहे. आता मतदान चिन्ह समजून सांगणे आणि क्रॉस व्होटींग न होणे, याकडे लक्ष दिले जात आहे. निवडणूक निकाल सोमवारी येणार आहे.