सांगली, दि. 11 जानेवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात संघर्ष सुरु आहे. शरद पवार वयाच्या ८५ व्या वर्षी पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या सोबतीला सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जयंत पाटील आहेत. त्याचवेळी अजित पवार आपला गट अधिक मजबूत करत आहेत. आता अजित पवार पुन्हा शरद पवार यांना धक्का देणार आहे. सांगलीतील शरद पवार यांचे विश्वासू जयंत पाटील यांना हादरा बसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सांगलीतील जयंत पाटील यांचे समर्थक असलेले माजी नगरसेवक अजित पवार गटात जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मुंबईतही घडामोडी झाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शरद पवार यांचे विश्वासू सहकारी राहिले आहे. बंडानंतर त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही. आता अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या जवळच्या असलेल्या काही माजी नगरसेवकांना आपल्या गटात घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत बुधवारी सायंकाळी भेट घेतल्याचे वृत्त आहे. लवकरच जयंत पाटील गटाचे हे माजी नगरसेवक अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा आहेत.
अजित पवार यांच्या भेटीला गेलेल्या माजी नगरसेवकाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. शहराच्या विकासासाठी निधीबाबत चर्चा करण्यासाठी आपण गेलो असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मिरज, कुपवाडमधील १४ माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हा धक्का मानला जात आहे. दरम्यान, या नगरसेवकांचा अजित पवार गटात लवकरच प्रवेश होईल अशी चर्चा आहे.
राष्ट्रवादीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी नगरसेवक विष्णू माने तसेच भाजप नेते सुरेश आवटी, माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी बुधवारी मुंबईत अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे उपस्थित होते.