मुंबईत लावलेल्या त्या बहुचर्चित बॅनरवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
मुख्यमंत्री शासकीय कार्यालयाचे जेवणाचे बिल देखील अडीच कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली. हे ईडी सरकार स्वतःची खुर्ची वाचवण्यात मग्न आहे.
नविद पठाण, बारामती, पुणे : मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर नेत्यांविरोधात बॅनर लावले जात आहे. जयंत पाटील, अजित पवार यांच्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांचे बॅनर लावले आहे. त्यात महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असे म्हटले गेले आहे. मात्र पोलिसांनी हे बॅनर तत्काळ काढून घेतले. यासंदर्भात बारामतीत माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या, भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले माझे पोस्टर कुठे लागले आहे, मला यासंदर्भात माहीत नाही. मी पाहिले नाही. त्या पोस्टरचे कुणाकडे फोटो आहेत का? फोटो मागवा, त्यानंतर मी उत्तर देईन.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका
सुप्रिया सुळे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांवर टीका केली. त्या म्हणाल्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे २४ तास निवडणुकांत रमलेले असतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत बोलण्यास त्यांना वेळ नाही. एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे.
राज्यभरातून शिक्षक आंदोलन करीत आहेत. अंगणवाडी सेविका देखील रस्त्यावर उतरल्या आहेत. परंतु राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
ज्योतिर्लिंगचा वाद
महाराष्ट्राच्या ज्योतिर्लिंगाबद्दल आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी निर्माण केलेल्या वादावर सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यात आहे. हा निर्णय कोणाचा नसून शंकराचार्यांनी घेतलेला आहे. त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि प्रशासन कोणीही काही बोललेलं नाही. त्यांचा मी जाहीर निषेध करते.
तसेच दुसऱ्या कुठल्याही राज्यातील सरकारला विनम्रपणे विनंती करतो तुम्ही पाहिजे तर पंधरा-सोळावे ज्योतिर्लिंग करा. त्यामुळे भीमाशंकरमुळे जो मान महाराष्ट्राला मिळालेला आहे तो मान आम्ही दुसऱ्या कुठल्याही राज्याकडे जाऊ देणार नाही.
जेवणाचे बिल देखील अडीच कोटी
आपण जो टॅक्स भरतो त्याच्यावर सरकारी जाहिराती केल्या जातात. मुख्यमंत्री यांच्या शासकीय कार्यालयाचे जेवणाचे बिल देखील अडीच कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली. हे ईडी सरकार स्वतःची खुर्ची वाचवण्यात मग्न आहे. हे सरकार अतिशय असंवेदनशीलआहे. त्यांना सर्वसामान्य मायबाप जनतेचा काही घेणे-देणे नाही. त्यांचेच आमदार म्हणतात ५० खोके एकदम ओके. मग त्यांना मायबाप जनतेचे दुःख कसे कळेल.
राज ठाकरे यांचे कौतूक
बाळासाहेबांनी त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल हे ठरवले होते. त्यामुळे राज ठाकरे यांचे मी मनापासून कौतूक करेल. त्यांनी शिवसेना फोडली नाही. एका मराठी माणसाने काढलेला पक्ष हा दुसऱ्याकडे जात आहे. दिल्लीकरांचा मराठी अस्मिता, मराठी भाषा मोडून शिवसेना संपवण्याचा कट आहे. महाराष्ट्राच्या विरोधात आणि मराठी माणसांच्या विरोधात हे केंद्र सरकार काम करतेय, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.