मटण खाऊन देवदर्शनाच्या वादावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?
सगळ्या विरोधी पक्षाच्या भावना पत्राद्वारे मोदी यांना पाठवल्या आहेत. मला वाटते यावर चर्चा व्हायला हवी. त्यात केंद्रीय संस्थांच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली आहे.
पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे नव्या वादात अडकल्या. त्यांनी मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा त्यांच्यावर आरोप झाला आहे. शिवसेनेचे माजी आमदार, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी हा आरोप करताना व्हिडीओही शेअर केला आहे. तसेच देवदर्शन घेतानाचे फोटोही शेअर केले. सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये मटण खाल्लं आणि नंतर देवदर्शन केलं. सुप्रिया सुळे यांनी महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असा आरोप शिवतारे यांनी केला. या सर्व प्रकारावर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिले. तसेच सुप्रिय सुळे यांच्या कार्यालयातनेही मोजक्या शब्दांत स्पष्टीकरण दिले.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सगळ्या विरोधी पक्षाच्या भावना पत्राद्वारे मोदी यांना पाठवल्या आहेत. मला वाटते यावर चर्चा व्हायला हवी. त्यात केंद्रीय संस्थांच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली आहे. महागाई आणि बेरोजगारी यावर मी संसदेत आवाज उठवत राहते. देशात कांद्याला भाव नाही मात्र जगात कांद्याला भाव आहे, ही परिस्थिती चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झाली आहे. यासंदर्भात केंद्राने काहीतरी करायला हवे, मात्र काही होत नाही.
कसब्यातील जनतेचे आभार
कसब्यात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडूण आल्याबद्दल मी महाराष्ट्र आणि कसब्यातील जनतेचे आभार मानते. भाजपने ज्या प्रकारे चुकीचा प्रचार केला त्याला पुण्यातील जनतेने उत्तर दिले, असे त्यांनी सांगितले. चिंचवडच्या पराभवाचे आम्ही चिंतन करत आहोत, असे स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनी दिले.
शिवतारे यांच्या आरोपावर
शिवतारे काय म्हटले हे मी पाहिले नाही. त्यावर मी काय बोलणार? मला ज्याची माहिती नाही, त्यावर मी बोलत नाही. मी सकाळपासून लोकांच्या पाण्यासाठी काम करत आहे, असे बोलत उत्तर देणे टाळले.
कार्यालयाने दिले स्पष्टीकरण
शिवतारे यांच्या या आरोपांनंतर सुप्रिया सुळे यांच्यावर टीका होत आहे. या सगळ्या आरोपांनंतर सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाच्या वतीने आता स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सुप्रिया सुळे मागच्या काही वर्षांपासून शाकाहारी झाल्या आहेत. त्या मांसाहाराचं सेवन करत नाहीत, असं सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.
पोस्टमध्ये काय म्हटलंय
शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवरील देवदर्शनाचे चार फोटो शेअर केले आहेत. तसेच हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना त्यावर कमेंट केली आहे. आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला ||, अशी खोचक टीका शिवतारे यांनी केली आहे.