Supriya Sule : पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देणाऱ्या अमोल मिटकरींच्या आम्ही पाठीशी, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
पंकजा मुंडे ही महाराष्ट्रातील एक कर्तृत्ववान महिला आहे. त्या कोणत्याही पक्षात राहिल्या तरी माझ्या नेहमीच त्यांना शुभेच्छा आणि प्रेम आयुष्यभर असेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुणे : पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख भाजपामध्ये छाटले जातात. असे म्हणत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देणाऱ्या अमोल मिटकरी यांच्या आम्ही पाठीशी आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. राष्ट्रवादीतर्फे आज कोथरूडमध्ये महागाईविरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांनी केले. यावेळी भाजपा आणि राजकारण यावर सुप्रिया सुळे यांनी टीका केली. आपल्याला बाजूला सारल्याची जाणीव पंकजा मुंडे यांना असावी. रोहिणी खडसे यांचे उदाहरण देत अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली. यावर सुप्रिया सुळे यांनी अमोल मिटकरी यांची पाठराखण केली आहे. विरोधी पक्ष असले तरी सर्वांचे एकमेकांशी संबंध चांगले असले पाहिजेत, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
‘कटुता वाढणे योग्य नाही’
स्व. गोपीनाथ मुंडे यांनी राज्याच्या राजकारणात मोठी आणि वेगळी ओळख आहे. जरी ते वेगळ्या पक्षात होते मात्र आम्हा सर्वांचेच वैयक्तिक संबंध अतिशय चांगले होते. तो काळच असा होता, आणि महाराष्ट्राची ही परंपरादेखील आहे, की जरी तुम्ही वेगळ्या पक्षात असाल, वैयक्तिक संबंध पाळलेच पाहिजेत. आता कुठेतरी कटुता वाढताना दिसत आहे. हे दुर्दैवी आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.
‘पक्ष जरूर विचार करेल’
अमोल मिटकरी यांना जर एखादा चांगला विचार मांडला असेल तर पक्ष जरूर त्या संदर्भाने विचार करेल. पंकजा मुंडे ही महाराष्ट्रातील एक कर्तृत्ववान महिला आहे. त्या कोणत्याही पक्षात राहिल्या तरी माझ्या नेहमीच त्यांना शुभेच्छा आणि प्रेम आयुष्यभर असेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
‘काय म्हणाले होते अमोल मिटकरी?’
गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांनी केलेल्या कामामुळे भाजपा पक्ष वाढला. मात्र सुडाचे राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव केला गेला. रोहिणी खडसे यांना हे लक्षात आले. मात्र पंकजा मुंडे यांच्याही लक्षात यायला हवे. आता 12 आमदारांची यादी राज्यपाल लवकरच मंजूर करणार आहेत. या यादीत पंकजा मुंडे यांचे नावही नाही. त्यामुळे पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख कसे छाटतात, हेच यातून दिसून येते. रोहिणी खडसे राष्ट्रवादीत आल्या. तशाच पंकजा मुंडे यांनीही पाऊल उचलावे, असे अमोल मिटकरी म्हणाले होते.