प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 25 डिसेंबर 2023 : त्यांनी वयाच्या 38 व्या वर्षी बंड केलं. मी 60 व्या वर्षी बाजूला झालो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता जोरदार टीका केली. अजितदादा यांच्या या टीकेचा शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे. सुप्रिया सुळे यांनी अजितदादा यांच्यावर पहिल्यांदाच टीका केली आहे. शरद पवार हे घराणेशाहीमुळे मुख्यमंत्री झाले नाहीत, असा टोला सुप्रिया सुळे यांनी अजितदादा यांना लगावला आहे. सुप्रिया सुळे यांच्या या वाक्यातून अनेक अर्थ निघत असून त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. शरद पवार यांनी 38 व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचे सत्य काय आहे ते शालिनाताई पाटील यांनी सविस्तरपणे मांडले होते. शरद पवार हे 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांच्यामागे माझ्या आणि दादांसारखी घराणेशाही नव्हती, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडणार असल्याचा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. काहींची बोलण्याची पद्धत वेगळी असते. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे तर त्यांचा उमेदवार असणारच, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आपला देश कृषी प्रधान आहे. मात्र, मागील काही काळापासून कृषी प्रधान देशाला पूर्णवेळ कृषीमंत्री नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जर दादांचं ऐकत असतील तर त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून द्यावी, असं आव्हानच त्यांनी दिलं. राज्यमंत्री मंडळामध्ये सध्या गँगवार सुरू आहे. कोणीच कोणाचे ऐकत नाही. राज्य सरकारला पॅालिसी पॅरलिसीस झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.