सूरज चव्हाण चार दिवसात मोठा बॉम्ब टाकणार; अंजली दमानिया यांची पोलखोल करण्याचा इशारा
रवींद्र धंगेकर यांच्या आंदोलनामुळे पोलिसांनी हिट अँड रन प्रकरणात कारवाई केली नाही. अटक सत्र झाले नाही. तर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. गृहमंत्री पुण्यात आले. उपमुख्यमंत्री अजितदादांनीही कारवाईचे आदेश दिले. त्यामुळेच ही कारवाई झाली आहे. कुणी आंदोलन केल्यामुळे झाली नाही, असं अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना फोन केला होता. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करायला पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. दमानिया यांच्या या मागणीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. अजितदादांची नार्को टेस्ट करणार असाल तर मग अंजली दमानिया यांचीही नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्यांचा या प्रकरणातील बोलविता धनी कोण आहे? हे समोर आलं पाहिजे, अशी मागणी करतानाच येत्या चार दिवसात अंजली दमानिया यांची पोलखोल करणार आहे, असा इशाराच सूरज चव्हाण यांनी दिला आहे.
टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना सूरज चव्हाण यांनी हा मोठा इशारा दिला आहे. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. आम्ही चौकशीला तयार नाही असं कधीच म्हटलं नाही. आम्ही चौकशीला घाबरत नाही. पण अंजली दमानिया यांचीही चौकशी झाली पाहिजे. राष्ट्रवादीवर टीका करायची, राष्ट्रवादीला बदनाम करण्याची त्यांनी कोणत्या वकिलाकडून सुपारी घेतलीय याचा गौप्यस्फोट मी करणार आहे. येत्या चार दिवसात हा गौप्यस्फोट करणार आहे. वकिलाच्या मध्यस्थीने हे आरोप होत आहेत. तसेच या वकिलाच्या पाठीमागे दुसराच हात आहे. त्यांचे दोन दिवसात आरोप होऊ द्या. त्यानंतर माझं चार दिवसात उत्तर येईल. मी पुराव्यानिशी पर्दाफाश करणार आहे, असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
बोलविता धनी कोण?
दमानिया यांनी अजितदादांवर जे आरोप केले आहेत. त्याचं अजितदादांनी खंडन केलं आहे. पालकमंत्री आणि राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून फोन केला आणि माहिती घेतली. ते त्यांचं कामच आहे. पण राष्ट्रवादीला बदनाम करण्याचं काम सामाजिक कार्यकर्तीच्या नावाखाली अंजली दमानिया यांच्याकडून होत आहे. अजितदादांची नार्को टेस्ट करा अशी त्यांची मागणी आहे. तर अंजली दमानिया यांचीही नार्को टेस्ट करण्याची आमची मागणी आहे. त्यांचाही सीडीआर चेक करा आणि मागच्या दोन महिन्यात त्या कुणाकुणाला भेटल्या त्याचीही चौकशी झाली पाहिजे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिमा मलिन व्हावी आणि पक्ष बदनाम व्हावं असं काम त्यांच्याकडून केलं जात आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीच्या मागचा बोलविता धनी कोण आहे, हे जाहीर झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे, असं चव्हाण म्हणाले.
म्हणून ते ट्विट केलं
सूरज चव्हाण यांनी सुरुवातीच्या काळात या प्रकरणात पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढणारे ट्विट केलं होतं. त्याचाही त्यांनी खुलासा केला आहे. प्रशासन प्रशासनाचं काम करत आहे. दोषींवर कारवाई करत आहे. काही लोकांचं निलंबन केलं आहे. प्रशासनाला कोणी अडथळे आणत असेल, या प्रकरणात प्रशासनाला 100 टक्के दोषी धरत असेल म्हणून मी म्हटलं रवींद्र धंगेकर स्टंटबाजी करत आहेत. मी केलेलं ट्विट सुरुवातीच्या काळातील होतं. आता प्रशासन चांगलं काम करत आहे. गुन्हेगारांना अटक करत आहे, असंही त्यांनी म्हटलं.
त्या अधिकाऱ्याचं निलंबन झालं
एका रात्रीच आरोपींची बेल झाली म्हणून मला प्रशासन दोषी वाटलं. त्यामुळेच मी ट्विट टाकलं. पण त्या अधिकाऱ्याची चौकशी झाली. तो दोषी आढळल्याने त्याचं निलंबन केलं. पुणे पोलिसांनी चुकीचं काम करणाऱ्याला सुट्टी दिली आहे, असंही त्यांनी सांगितलं.