नातवामुळे आजोबा अडचणीत, सुरेंद्र अग्रवाल यांची कुंडलीच पोलिसांनी बाहेर काढली
पुणे हिट अँड रन प्रकरणात आता पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे. पुणे पोलिसांकडून प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवल्यानंतर पोलीस अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी आज सुरेंद्र अग्रवाल यांना कोर्टात हजर केलं. सुरेंद्र यांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात आता सुरेंद्र अग्रवाल यांच्या अडचणी वाढणार आहेत. पुणे पोलिसांनी दावा केला आहे की, सुरेंद्र अग्रवाल यांनी २ दिवस त्यांच्या ड्राईव्हरला कोंडून ठेवले होते. त्याने गुन्ह्या आपल्या अंगावर घ्यावा म्हणून त्याला जबरदस्ती करण्यात आली होती. अपघात प्रकरणात एकाच घरातील तीन पिढ्या अडचणीत आल्या आहेत. गाडीने २ जणांना उडवणाऱ्या अल्पवयीन मुलाला सुधार गृहात पाठवण्यात आले आहे. तर वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल हे तुरुंगात आहेत. सुरेंद्र अग्रवाल यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर विशाल अग्रवाल हे न्यायालयीन कोठडीत आहेत.
सुरेंद्र अग्रवाल तपासात सहकार्य करतील. त्यांना मेंदुचा आजार आहे त्यामुळे वेळोवेळी डॉक्टरांना बोलवावं लागतं म्हणून त्यांना जामीन मिळावा असा त्यांच्या वकिलांनी सुनावणी दरम्यान युक्तीवाद केला आहे. गुन्हे शाखेकडून देखील सुरेंद्र अग्रवाल यांच्या घराची झडती घेण्यात आली.
कोण आहेत सुरेंद्र अग्रवाल
सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर याआधी देखील वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.ते बांधकाम व्यावसायिक आहेत. गोळीबार प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. अजय भोसले यांच्यावरील गोळीबार प्रकरणात ते सहआरोपी आहेत. सुरेंद्र अग्रवाल यांचे छोटा राजनसोबत संबंध असल्याचं समोर आलं होतं.
याआधी विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली होती. विशाल अग्रवाल आता न्यायालयीन कोठडीत आहेत. गुन्हे शाखेने या प्रकरणात घरातील इतर कर्मचाऱ्यांची देखील चौकशी केली आहे.
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी ड्रायव्हरच्या पत्नीची देखील चौकशी होणार आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पार्वती पुजारी यांची चौकशी होणार आहे. ड्राईव्हर गंगारामला कोणी आणि कसं डांबून ठेवलं याबद्दल अनेक पुरावे त्यांच्या पत्नीकडे असण्याची शक्यता आहे. दरम्यान पोलिसांनी ड्राईव्हरला देखील सुरक्षा पुरवली आहे.