याचा अर्थ शीतल म्हात्रे यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी असभ्य कृती…; सुषमा अंधारे यांचं मोठं विधान
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शीतल म्हात्रे व्हायल व्हिडीओ प्रकरण आणि अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. ब्लॅकमेलिंग प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पुणे : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही सवाल केले आहेत. कुठल्याही पक्षाची महिला असो तिची बदनामी होता कामा नये. तिच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये. तिचं व्यक्ती स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ नये, असं सांगतानाच व्हायरल व्हिडीओसाठी आपल्याकडे कलमं नाहीत. पण या प्रकरणात तुम्ही चुकीची कलमं लावली आहेत. तो व्हिडीओ मॉर्फ केलेला नाही. या प्रकरणात जी कलमं लावली आहेत. ती लैंगिक कृतीचा प्रसार आणि प्रचार करणारी आहेत. याचा अर्थ शीतल म्हात्रे यांनी पब्लिक प्लेसमध्ये असभ्य कृती केली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही सार्वजनिक ठिकाणी असभ्य कृती केल्याचं कलम लावा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
शीतल म्हात्रे प्रकरणाचा निकाल लागणार नाही. शीतल म्हात्रे या सगळ्या लढाईत एकट्या पडल्या आहेत. त्यांना ठरवून टार्गेट केलं जात आहे. मी कुणाच्याही मदतीला जाईन. उद्या चित्रा वाघ अडचणीत असल्या तरी मी त्यांच्या मदतीला जाईन, असं सांगतानाच प्रकाश सुर्वे आणि राज सुर्वे का बोलत नाहीत? आपली बहीण एवढी अडचणीत असताना प्रकाश सुर्वेंनी बोललंच पाहिजे, असं आवाहन सुषमा अंधारे यांनी केलं. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.
तेवढी आमची औकात नाही
यावेळी त्यांनी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याच्या प्रकरणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी कुणावरही टीका केली नाही. मी फक्त प्रश्न विचारले. त्या तरुणीसोबत सहा वर्षाची ओळख असून अमृता फडणवीस यांना काहीच कळलं नाही हे कसे शक्य आहे? वहिनी खरंच आमची एवढी औकात नाही हो. सत्तेत आल्यावर चेहरामोहरा बदललात तेवढी आमची औकात नाही. पोलिसांना तिकीट विकण्याचा कार्यक्रम तुम्ही दिलात. मी पुराव्यासहीत अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारले. मी आरोप केला नाही, असं सांगतानाच शासकीय बंगल्यावर इंस्टाग्रामचा रिल करण्यात आली तेव्हा भक्तगण कुठे होते? असा सवाल त्यांनी केला.
ब्लॅकमेलिंग प्रकरणी एसआयटी नेमा
गृहमंत्र्यांच्या पत्नीला सहा वर्षापासून ही गोष्ट माहिती नाही हे नवल. तुम्हाला जेव्हा माहिती झालं तेव्हा का नाही थांबला? जे काही घडलं आहे ती गोष्ट साधी सोपी नाही. अमृता वाहिनी अख्ख्या देशातले डिझायनर ओस पडले होते का? केंद्रीय गृह यंत्रणा तुमची, राज्यातली गृह यंत्रणा तुमची, पोलीस खातं तुमचं तरीसुद्धा तुम्ही काहीच करू शकला नाहीत. फडणवीस यांच्या या प्रकरणात एसआयटी स्थापन झालीच पाहिजे. अमृता फडणवीस यांची फसवणूक ही तर गृहमंत्र्यांची नाचक्की झाली आहे. फसवणूक नाही झाली संगमताने सगळे शांत बसले. देवेंद्रजी हे चाणक्य नाहीत. तुम्ही मान्य करा. कारण फडणवीस सारख्या चाणक्य माणसाची कोणीच फसवणूक करू शकत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
जिंकेपर्यंत लढू
सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. कधीही निकाल येण्याची शक्यता आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रकरणाचा निकाल लागेल. न्याय मिळणार की नाही हे नंतर बघू. पण निकाल लागेल. निकाल आमच्याविरोधात गेला तर आम्ही जिंकेपर्यंत लढू, असं सांगतानाच राहुल नार्वेकर यांच्याकडून आम्हाला काहीच अपेक्षा नाहीत, असंही त्या म्हणाल्या.