पुणे: मी कुणाच्याही श्रद्धे आड आले नाही. पण तरीही राजकीय सूडबुद्धीतूनच मला विरोध केला जात आहे. मला विरोध करण्यामागे भाजप पुरस्कृत वारकरी आघाडीचे लोक आहेत, असं सांगतानाच तरीही जर माझ्यामुळे संतांच्या, वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागते, असं म्हणत ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांची जाहीर माफी मागितली आहे. सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माफी मागितली आहे.
मी संत ज्ञानेश्वरांबद्दल काहीही वावगे बोलले नाही. माझ्या आईच्या संदर्भाने बोलत असताना मी ते विधान केलं होतं. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली. त्यांना माऊली म्हटलं गेलं. माझे वडील गेले. त्यानंतर माझ्या आईने 15 एकर कोरडवाहू शेतीत काम करून चार भिंतीचं घर चालवलं. ती माझ्यासाठी विश्ववंदनीय असली पाहिजे, असं मी म्हटलं होतं. पण ते विधान कापलं गेलं, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
2019-2020मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुळे मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा या निर्णयाला विरोध करण्यासाठी सर्वात पुढे ह.भ.प. गणेश शेटे हेच होते. तेच आता मला विरोध करत आहेत. आचार्य तुषार भोसले यांचाच हा कंपू आहे. जे लोक वारीत कधीच पायी चालले नव्हते, त्या लोकांनी लोकांचं आरोग्य लक्षात न घेता केवळ स्टंट केला होता, अशी टीका त्यांनी केली.
भाजपने उघडलेली जी वारकरी आघाडी आहे. त्यातील हे लोक आहेत. या लोकांनी देहू आळंदीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाचारण केलं आणि तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिलं नाही. उपमुख्यमंत्रीपद हे असंवैधानिक आहे, अशी सबब त्यावेळी या लोकांनी दिली होती. आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घेतात ते असंवैधानिक मानायचे का? असा सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जेव्हा जेव्हा मी धारेवर धरत प्रश्न विचारते तेव्हा अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल केले जातात. मी कुणाच्याही श्रद्धेच्या आड आले नाही. मी कबीर पंथी आहे. मी कर्मकांड मानत नाही. मी फक्त चैतन्य मानते. तहीरी मला विरोध होतोय. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मला सुडबुद्धीने विरोध होतोय. विरोध करणाऱ्यांमागे भाजपचा हात आहे. विरोध करणारा वारकऱ्यांचा गट भाजपचा आहे, असं त्या म्हणाल्या.
वारकऱ्यांनी काल माझी प्रेत यात्रा काढली. या देशात अनेक सुधारकांच्या प्रेत यात्रा काढल्या गेल्यात, त्याला इतिहास साक्ष आहे. मला आनंद आहे माझी एवढी दखल घेतली जात आहे. पण दखल घेताना राजकीय सूडबुद्धीने घेतली जात आहे, असलं सांगतानाच वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.
अंत्ययात्रा काढणं वारकरी परंपरेत बसत नाही. अंत्ययात्रेच्यावेळी कुणीही भगवा फेटा घालून बसत नाही. काल माझ्या अंत्ययात्रेत एक महाराज भगवा फेटा घालून बसलेले होते. भगवा रंग हा वारकरी संप्रदायाची पताका आहे. त्याचा रंग भगवा आहे. त्याचा तुम्ही अवमान करत आहात, असा टोलाही त्यांनी लगावला.