झुकेगा नही साला हा डायलॉग भारीच होता… फडणवीस यांच्या डायलॉगवर सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?
ठाकरे गटाचे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुमच्या घरात एक बाई स्पायिंग करत होती. ते तुम्हाला कळलं नाही. अन् झुकेगा नही म्हणता?, असा चिमटा सुषमा अंधारे यांनी काढला आहे.
पुणे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फडतूस गृहमंत्री असा उल्लेख केला होता. त्यावरून भाजप नेते आक्रमक झाले. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर उद्धव ठाकरे यांना घरातून बाहेर पडणं मुश्किल करू असा इशारा दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा समाचार घेतला. फडतूस नाही, काडतूस आहे. झुकेगा नही घुसेगा साला, अशा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. फडणवीस यांच्या या डायलॉगवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सुषमा अंधारे यांनी ट्विट करून फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. झुकेगा नही साला हा डायलॉग भारीच होता. पण 2016 पासून तुमच्या घरात एक बाई घूसली आणि तुमच्याच पत्नीवर स्पायिंग करत होती. हे तुम्हाला 7 वर्ष कळले नाही आणि तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात हे काय पटत नाही राव? अशी बोचरी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. सुषमा अंधारे यांचं हे ट्विट वेगाने व्हायरल होत असून त्यावर प्रतिक्रियांचा पाऊसही पडत आहे.
काय म्हणाले फडणवीस
नागपूर येथे काल सावरकर गौरव यात्रा सुरू होती. यावेळी झालेल्या सभेला देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं. आज ते मला म्हणाले फडतूस गृहमंत्री. उद्धव ठाकरे फडतूस नही काडतूस हूँ मैं. झुकेगा नही साला घुसेगा… घुसेगा… असं फडणवीस म्हणाले होते.
“झुकेगा नही घुसेगा साला” हा डायलॉग भारीच होता पण 2016 पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नी वर स्पायिंग करत होती हे तुम्हाला 7वर्षे कळले नाही आणि तुम्ही #घुसायच्या बाता कराव्यात हे काय पटत नाही राव !!@ShivsenaUBTComm @ShivSenaUBT_ @AUThackeray @OfficeofUT
— SushmaTai Andhare? (@andharesushama) April 5, 2023
संजय राऊत यांची टीका
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. आम्ही कुठं बोललो झुका म्हणून. हे सगळे झुके आहेत. डॉ. मिंधे यांच्या टोळीने एका आमच्या महिलेवर हल्ला केला. त्यांना भेटीसाठी उद्धव ठाकरे गेले होते. त्या महिलेवर हल्ला झाला. या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने नपुसंक म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी सौम्य शब्दात टीका केली. उद्धव ठाकरे यांना फडतूस म्हणाले. त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दात टीका केली. हे लोक म्हणजे भिजलेली काडतूस आहेत. यांची काडतूसे कधीच उडणार नाहीत. कारण ती भिजलेली आहे. हिंमत असेल तर ईडी आणि सीबीआय बाजूला ठेवून या. काडतूस कुठे घुसतं ते दाखवतो, असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं होतं.