अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 13 ऑक्टोबर 2023 : आमदार अपात्रतेच्या प्रकरणात होत असलेल्या दिरंगाईवरून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलंच फटकारलं आहे. विधानसभा अध्यक्षांना आदेश देऊनही कोणतीच कार्यवाही केली नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. तसेच पुढच्या निवडणुकीच्या आधी निर्णय घ्या. त्यानंतर निर्णय घेतला तर ती कार्यवाही निरर्थक ठरेल, असं कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाने नार्वेकर यांना फटकारल्यानंतर ठाकरे गट आणि शरद पवार गटाने नार्वेकर यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही नार्वेकर यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे.
राहुल नार्वेकरांचं काम बघितलं की मला होणार सून मी या घरची ही मराठी सीरिअल आठवते. त्यातली जानवी. तिला बाळच होत नव्हतं ते सगळं आठवतं. कारण राहुल नार्वेकरांच्या निकालाचे देखील तसेच आहे, तो काही येतच नाही, असा चिमटा काढतानाच नार्वेकर साहेबांचं काम म्हणजे शिंदे गटाला होणारी मदतच आहे. कोर्टाचं नार्वेकर ऐकतील का? शहाण्याला शब्दांचा मार असतो हे कळण्या इतके हे लोक विवेकी आहेत का?अध्यक्ष नेमण्यात आला ते देखील योग्य आहे का? असे सवाल सुषमा अंधारे यांनी केले.
ससून ड्रग्स प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ससून ड्रग्स प्रकरणात नार्को टेस्ट झाली पाहिजे. राज्यातील अनेक मंत्री आणि आमदार या प्रकरणात गोवले गेले आहेत. राज्यातलं गृहखातं आणि आरोग्य खातं सध्या व्हेंटिलेटरवर आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही या सगळ्यावर आवाज उठवू. 24 ऑक्टोबरनंतर संजीव ठाकूर यांना ससून रुग्णालयात काम करू देणार नाही, असा इशाराच अंधारे यांनी दिला.
ललित पाटील यांच्यावर गिरीश महाजन यांचा देखील वरदहस्त असू शकतो. आताच माझ्याकडे एक व्यक्ती आली होती. ज्यांची बायको गेल्या अनेक दिसांपासून बेपत्ता आहे. याच स्त्रीवर संजीव ठाकूर यांनी 45 दिवस शॉक ट्रीटमेंट केली होती. त्यावेळी गिरीश महाजन यांनी संजीव ठाकूर यांच्यावर दबाव आणला होता. म्हणून यात देखील महाजन यांचा हात असू शकतो, असा खळबळजनक आरोप अंधारे यांनी केला.