आरोपी दत्ता गाडे याला पॉर्न व्हिडिओची चटक, स्वारगेट बलात्कार प्रकरणात tv9 च्या हाती समरी अहवाल, एकामागून एक धक्कादायक खुलासे
Swargate Sexual Assault : फेब्रुवारी महिन्यात स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बलात्काराची घटना घडली होती. त्यामुळे महाराष्ट्र हादरला होता. आरोपी दत्ता गाडे याने तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात समरी अहवाल समोर आला आहे. त्यात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे.

स्वारगेट बसस्थानकात फलटणाला जाण्यासाठी आलेल्या तरुणीवर दत्ता गाडे या नराधमाने बलात्कार केला होता. गजबजलेल्या बसस्थानकात हा प्रकार घडल्याने राज्यातच नाही तर देशात खळबळ उडाली होती. आरोपी एका ऊसाच्या शेतात लपला होता. त्याला रात्रीतूनच पोलिसांनी उचलले होते. आरोपीने त्यानंतर अनेक दावे करत तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला होता. आता याप्रकरणाचा समरी रिपोर्ट टीव्ही ९ मराठीच्या हाती आला आहे. त्यात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
काय आहे समरी अहवालात?
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील तपास समरी tv9 च्या हाती आला आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणात पुणे पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले आहे. या समरी अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणाच्या तपासात जवळपास 20 हून अधिक मुद्यांआधारे आरोपीचा खोटारडेपणा उघड झाला आहे. या घटनेनंतर जे प्रश्न उपस्थित करण्यात येत होते, त्यांची उत्तरे या समरी अहवालात समोर आली आहे. तर दत्ता गाडे याने तो लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याचा केलेला दावा सुद्धा खोटा असल्याचे समोर आले आहे.




समरी अहवालातील महत्त्वाचे मुद्दे
१. हा गुन्हा २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ०५:४५ वा. ते ०६:४५ वाजेदरम्यान स्वारगेट बस स्टॅण्ड मधील थांबलेल्या शिवशाही बस क्रमांक एम.एच ०६ बी.डब्लु ०३१९ (स्वारगेट-सोलापुर) या बस स्वारगेट, पुणे या ठिकाणी घडला.
२. पीडिता (फिर्यादी) या फलटणला जाणाऱ्या बसची वाट पहात फलाट क्रमांक २२ येथील खुर्चीवर बसलेली होती. त्यावेळी आरोपी तिच्या जवळ आला आणि पीडितेला फसवून बसमध्ये घेऊन गेला. त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. प्रकरणात स्वारगेट पोलीस ठाण्यात नमूद कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
३. पीडितेची ससून हॉस्पिटल येथे महिला डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दिलेल्या नमुने पुण्यातील रासायनिक प्रयोगशाळा येथे पुढील तपासासाठी पाठवण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. कपडे सुद्धा तपासणीला पाठवून अहवाल प्राप्त करण्यात आला.
४. सदर घटनास्थळावर केस आणि आरोपीच्या शर्टचे बटण मिळाले. ते रासायनिक प्रयोगशाळेत पाठवून अहवाल प्राप्त करण्यात आला असता, ते बटण आरोपीचेच असल्याचे निष्पन्न झाले.
५. गुन्हा घडलेली शिवशाही बसच्या दक्षिणोत्तर बाजूस २ इतर बस लागलेल्या होत्या. घटना घडतेवेळी त्या बसमध्ये कोणीही प्रवाशी नसलेबाबत त्या बसच्या कंडक्टर आणि ड्रायव्हर यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.
६. गुन्हयाच्या तपासादरम्यान वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या मार्फत आरोपीचा शोध घेण्यात आला. आरोपी हा दत्तात्रय रामदास गाडे रा. गुनाट, ता. शिरुर, जि. पुणे हा असल्याचे निष्पन्न झाले व तो गुन्हा करून दि. २५/०२/२०२५ ते दि. २८/०२/२०२५ रोजी पर्यंत त्याची अटक चुकवण्याच्या उद्देशाने त्याच्या गावातील शेतात लपून बसला होता. त्याचा ड्रोन कॅमेरे, डॉग स्कॉड आणि स्थानिक रहिवाशी यांच्या मदतीने शोध घेवून दि. २८/०२/२०२५ रोजी पकडण्यात आले व त्याची दि. १२/०३/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आली.
७. आरोपी हा गुन्हा करतेवेळी स्वारगेट बस स्टँड येथे पहाटेपासून असल्याचे आणि तो पीडितेसोबत बोलताना पाहिलेले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आढळले. सविस्तर तपास करून त्यांचा जबाब न्यायालयासमक्ष घेण्यात आलेले आहे.
८. नमूद गुन्ह्याच्या तपासादरम्याने पोलीस कस्टडीमध्ये असलेला आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याने गुन्ह्याच्या वेळी असलेले कपडे गुनाट गावातून काढून दिले ते दोन सरकारी पंचासमक्ष मेमोरेंडम पंचनाम्याने जप्त करण्यात आले. रासायनिक प्रयोगशाळेत ते पाठवून अहवाल प्राप्त करण्यात आला.
९. सदर आरोपीची ससून हॉस्पिटल येथे सक्षमतेची तपासणी करण्यात आली असता ३ तज्ञ डॉक्टरच्या टीमने तो लैंगिक दृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल दिला.
१०. आरोपी आणि पीडितेचे डीएनए तपासणीसाठी ससून हॉस्पिटलमधून नमुने मिळवले. ते रायासनिक प्रयोगशाळेत पाठवून अहवाल प्राप्त करण्यात आला.
११. पीडितीने गुन्हा घडल्यानंतर पहिल्यांदा कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना घटनेची माहिती दिली. त्या दोघांकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस करण्यात आली. पीडितेने गुन्ह्याचा जो घटनाक्रम सांगितला, त्याची सविस्तर टिप्पणे घेण्यात आली आणि न्यायालयासमक्ष जबाब नोंदविण्यात आला.
१२. स्वारगेट एस टी स्टॅण्ड येथील सीसीटीव्ही फुटेज सायबर तज्ञाकडून प्राप्त करण्यात आले. रासायनिक प्रयोगशाळेत ते पाठवून आरोपी हा घटनास्थळावर उपस्थित असल्याबाबत अहवाल प्राप्त झाला आहे.
१३. आरोपीचा मोबाईल मिळून आला नसल्याने त्याचा नवीन मोबाईल नंबर प्राप्त करून सायबर तज्ञाद्वारे त्याच्या वापरत्या जी मेल ची गुगल सर्च हिस्ट्री चेक केली. त्यावेळी तो वारंवार आणि भरपूर वेळा पॉर्न व्हिडीओ पाहत असल्याचे निष्पन्न झाले. सविस्तर गुगल सर्चहिस्ट्री पंचनामा करण्यात आला आहे.
१४. पीडिता गुन्हा घडतेवेळी शिवशाही बसमधून मदतीसाठी ओरडली, पण तिचा आवाज बाहेर येतो अगर कसे याबाबत साऊंड इंजिनियर यांच्या मदतीने २ पंचासमक्ष ध्वनी तीव्रता पडताळणी पंचनामा करण्यात आला. त्यात पीडितेचा आवाज हा बाहेर येत नसल्याचा निष्कर्ष तज्ञांनी दिला.
१५. हवेली येथील कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी घेतलेल्या ओळखपरेड पंचनाम्यामध्ये पीडितीने आरोपीस ओळखले. त्याप्रमाणे त्यांनी पंचनामा केला.
१६. आरोपीचे मोबाईल नंबरचे तांत्रिक तपास करून त्याचे गुन्हा घडतेवेळीचे लोकेशन गुन्ह्याच्या ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले. तर तो यापूर्वी सुद्धा स्वारगेट एस टी स्टॅण्ड येथे वारंवार येत असल्याचे आढळून आले आहे.
१८. या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण ८२ साक्षीदार आणि १२ पंचनामे करण्यात आले आहेत.
१९. एकंदरीत तपासावरुन पीडिता (फिर्यादी) ही फलटणला जाणाऱ्या बसची पाट पहात असताना आरोपीने तिला फसवून बसमध्ये नेले. बस मध्ये कोणी नाही, खाली जाऊ दे अशी पीडिता विनवणी करीत असताना आरोपीने तिला जबरदस्तीने जोरात बसच्या सीट नंबर ७८ वर ढकलले. त्यावेळी ती वाचवा, मला वाचवा असे जोरात ओरडत होती.
पण बसमध्ये पूर्ण अंधार तसेच बसचे दोन्ही दरवाजे बंद असल्याने त्या बसच्या दोन्ही बाजूस इतर बस लागल्या असल्याने पीडितेचा आवाज बाहेर कोणालाही गेला नाही. आरोपीने पीडितेचे तोंड दाबून अत्याचार केला. तसेच पीडितेवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. पुण्यातील शिवाजीनगर येथील न्यायालय क्रमांक ८ मध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे