सावरकर यांच्यांवरील वादात हिंदू महासंघाने महात्मा गांधी यांना आणले, राहुल गांधींवर टीका करताना सोडली पातळी
राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्यांवर केलेल्या टीकेनंतर महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. आता यात हिंदू महासंघाने उडी घेतली. हिंदू महासंघाने राहुल गांधी यांना अंदमानची तिकीटे पाठवली. एक दिवस त्यांनी अंदमानच्या कोठडीत राहून दाखवा, असे आव्हान दिले.
पुणे : खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात वाद निर्माण करणारे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी आपण माफी मागणार नसल्याचं सांगताना स्वातंत्रवीर सावरकर यांच्यांवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले होते की, मी माफी मागणार नाही, कारण मी गांधी आहे. सावरकर नाही. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर स्वातंत्रवीर सावरकर प्रेमी, भाजप, उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी राहुल गांधी यांच्यांवर टीका केली. परंतु आता हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन या वादात तेल ओतण्याचे काम केलेय.
राहुल गांधी यांना पाठवली तिकिटे
हिंदू महासंघ आज राहुल गांधी यांना अंदमानची तिकिटे पाठवली. एक दिवस त्यांनी अंदमानच्या कोठडीत राहून दाखवा. 8 बाय 9 फुटाच्या काळ्या कोठडीत सावरकर 11 वर्ष राहिले. एकाच भांड्यात प्रात विधी आणि जेवण मिळत होते. अगदी आत्महत्या करण्याचे विचार मनात येऊन सुद्धा त्यांनी महाकाव्य लिहिली. तेथील कैद्यांना शिक्षण दिले. अंधश्रद्धा घालवणारे नेते म्हणून वीर सावरकर यांची ओळख आहे. त्यांचा त्याग समजून घ्यायचा असेल तर एक दिवस तरी त्या कोठडीत रहा, त्यासाठी हिंदू महासंघ राहुल गांधी यांनी अंदमानची तिकिटे पाठवत आहे. 28 रोजी दिल्लीहून जाण्याचं आणि 30 रोजी येण्याच तिकीट आज राहुल गांधी यांना मेल करत आहोत, असे आनंद दवे यांनी म्हटले.
काय म्हणाले आनंद दवे
सावरकारंवर बोलणं थांबलं नाही तर मग मात्र महात्मा गांधीची 100 पापं आम्ही समोर ठेऊ, भारताची झालेली फाळणी, हिंदूंचा झालेला नरसंहार यांची पुस्तके प्रसिद्ध करु, काही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत, असे वक्तव्य आनंद दवे यांनी केले. राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांचा अभ्यास केला असता तर त्यांनी अशी वक्तव्य केली नसती. कारण इंदिरा गांधींनी 11 हजारांची देणगी सावरकर प्रतिष्ठानसाठी दिली होती. या देशाला दुसरा गोडसे परवडणार नाही. कारण गांधी होते म्हणून गोडसे तयार झाले, असं आमचं म्हणणं असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय पक्षाच्या उद्दीष्टांसाठी कोणाला टार्गेट ठेवणं बरोबर नाही, सावरकारंवर टीका केली की प्रसिद्धी मिळते, यामुळे राहुल गांधी वारंवार त्यांच्यांवर टीका करत आहे, असे दवे म्हणाले.
काय म्हणाले होते राहुल गांधी
माझी खासदारकी रद्द झाल्यानंतर सर्वच विरोधी पक्षांनी मला पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आम्ही सर्व मिळून काम करू, असं राहुल गांधी म्हणाले. तुम्ही माफी मागितली असती तर तुमची खासदारकी वाचली असती. तुम्ही माफी का नाही मागितली? असा सवाल राहुल गांधी यांना विचारण्यात आला. त्यावर मी गांधी आहे. गांधी कधीच माफी मागत नाही. मी सावरकर नाहीये, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.