रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक, प्रवाशाची ही मोलाची वस्तू केली परत
गणेश यांना नसरापूर चेलाडी येथे एक प्रवासी भेटला. त्यानंतर शिवापूरला एक आणि शिंदेवाडी येथे एक असे तीन प्रवासी भेटले. तिन्ही प्रवासी कात्रज पुणे येथे उतरले.
पुणे : गणेश शिवतरे हे भोर तालुक्यातील उत्रौली गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच शेती पाहून रिक्षाचा व्यवसाय करतात. गणेश शिवतरे हे रिक्षा व्यवसाय करण्यासाठी रोज उत्रौलीवरून आपली रिक्षा घेऊन सकाळी पुण्याला जातात. दिवसभर धंदा करुन रात्री घरी येतात. पुण्याला जाता येता चार पैसे मिळतील या आशेने रिक्षात प्रवाशी घेत असतात. रविवारी 9 मार्च रोजी नेहमीप्रमाणे ते पुण्याला जात होते. गणेश यांना नसरापूर चेलाडी येथे एक प्रवासी भेटला. त्यानंतर शिवापूरला एक आणि शिंदेवाडी येथे एक असे तीन प्रवासी भेटले. तिन्ही प्रवासी कात्रज पुणे येथे उतरले.
डायरीत सापडला फोन नंबर
त्यानंतर रिक्षाला ऑनलाईन हडपसरचे भाडे लागले. त्यावेळी त्यांना कोणाची तरी बॅग रिक्षात राहिल्याचे दिसून आले. लागलीच ती बॅग शिवतरे यांनी डिकीत सुरक्षित ठेवली. भाडे मारून झाल्यावर त्यांनी ती बॅग खोलून पहिली. तेव्हा त्यात एक डायरी, एक तोळ्याची चैन आणि तब्बल तीस हजार रुपयांची रोख रक्कम आढळली. डायरी पहिली असता त्यात एक फोन नंबर मिळाला.
प्रवाशाशी साधला संपर्क
त्या नंबरवर रिक्षाचालक शिवतरे यांनी फोन लावला. समोर बोलणारे दत्तात्रय इंगुळकर (रा. कामथडी ता.भोर) हे पुणे शहरात कामानिमित्त गेले होते. त्यांना फोनद्वारे बॅग सुरक्षित असल्याचे शिवतरे यांनी सांगितले. संध्याकाळी ६:३० वाजता फोनवर संपर्क केला. त्यांची बॅग, बॅगेतील ३० हजारांची रोख रक्कमेसह एक तोळ्याची चैन त्यांना परत केली.
गणेश यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक
यावेळी दत्तात्रय इंगुळकर यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या वडिलांनी रिक्षाचालक गणेश शिवतरे यांचे कौतुक केले. हल्लीच्या काळात प्रामाणिकपणाचे उदाहरण दाखवून दिल्याने त्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले. गणेश शिवतरे यांच्या प्रामाणिकपणाचे भोर तालुक्यातून तसेच सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
रिक्षामध्ये विसरलेली प्रवाशाची रोख रक्कम आणि सोन्याची चैन असलेली बॅग रिक्षाचालकाने परत केलीय. पुण्याच्या भोरमध्ये ही घटना घडलीय. गणेश शिवतरे असं रिक्षाचालकाचे नाव आहे. रिक्षाचालकाच्या या प्रामाणिकपणाचे सर्वस्तरातून कौतुक होतंय.