Shivsena : भात्यातले कितीही बाण जाऊ द्या, मात्र शिवसेनेचा धनुष्यबाण टिकवण्यास कटिबद्ध; भोरमधल्या शिवसैनिकांचा निर्धार
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे 8 ऑगस्टला संख्याबळ दाखवले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भोर येथे झालेल्या शिवसेनेच्या आढावा बैठकीत शिवसैनिकांनी हा निर्धार केला.
भोर, पुणे : भोर आणि वेल्हा तालुक्यातील एकही शिवसैनिक (Shivsainik) फुटीर शिंदेगटात जाणार नाही, असा आत्मविश्वास येथील शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. संकटकाळात भात्यातील कितीही बाण जाऊ द्या, पण शिवसेनेचा धनुष्यबाण टिकवण्यासाठी तमाम शिवसैनिक कटीबद्ध आहेत. भोर आणि वेल्हा तालुक्यातील एकही शिवसैनिक फुटीर शिंदेगटात गेला नाही आणि जाणार नाही, असा आत्मविश्वास व्यक्त करण्यात आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याच पाठीशी असल्याचा निर्धार भोरमधील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून काही शिवसैनिक संभ्रमावस्थेत आहेत. अशा राजकीय वातावरणात अनेक शिवसैनिकांना शिंदे गटाकडून दबाव आणला जात असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. मात्र कडवट शिवसैनिक आता आक्रमक झाले असून शिवसेनेच्याच (Shivsena) सोबत राहण्याचा निर्धार करण्यात येत आहे.
भोरमध्ये आढावा बैठक
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या हक्काबाबत शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे 8 ऑगस्टला संख्याबळ दाखवले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भोर येथे झालेल्या शिवसेनेच्या आढावा बैठकीत शिवसैनिकांनी हा निर्धार केला. शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणीच्या काळात, भोर, वेल्हा तालुक्यातल्या शिवसैनिकांनी त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी शपथपत्र आणि सभासद नोंदणी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशा सूचना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदोरे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.
शिंदे गटात गेलेल्यांना होत आहे पश्चाताप
राजकीय आमिषांना बळी पडून काही शिवसैनिक शिंदे गटात गेल्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. त्याला आता सुरूंग लागत आहे. शिवसेना पक्षाची झालेली अवस्था पाहून शिंदे गटात सहभागी झालेले राजू विटकर हे पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. मागील काही दिवसांपासून शिवसेनेतून आमदार, खासदार तसेच पदाधिकारीदेखील शिंदे गटात सहभागी होत आहेत. तर विटकर यांच्या रुपाने नवी पायंडा पडत आहे. शिवसेनेत परत आल्यानंतर त्यांना रडू कोसळले तसेच बंड केलेल्यांनी परत यावे, असे आवाहनही केले आहे.