Pune crime : धारदार शस्त्रांनी केले वार, वाहतूक पोलिसावरही टोळक्याचा हल्ला; कात्रजमधला थरार
एका तरुणावर धारदार शस्त्रांनी वार (Attack) केल्याची घटना पुण्यातील कात्रज (Katraj) याठिकाणी घडली आहे. दोन युवकांमधील वादात वाहतूक पोलिसाने (Traffic Police) मध्यस्थी केली असता त्याच्यावरही हल्ला करण्यात आला आहे.
पुणे : एका तरुणावर धारदार शस्त्रांनी वार (Attack) केल्याची घटना पुण्यातील कात्रज (Katraj) याठिकाणी घडली आहे. दोन युवकांमधील वादात वाहतूक पोलिसाने (Traffic Police) मध्यस्थी केली असता त्याच्यावरही हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तर तीन जणांचा शोध सुरू आहे. येथील कात्रज चौकात गुरुवारी रात्री 8 वाजता प्रीतम माधव लोणकर (30) यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आला. भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज येथील कैफ आरिफ शेख (18) या बेरोजगार युवकाला याप्रकरणी अटक केली असून त्याच्या तीन साथीदारांचा शोध सुरू आहे. या हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र एका क्षुल्लक कारणावरून हा हल्ला करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
हल्लेखोरांपैकी एकाने केली शेरेबाजी
वाहतूक पोलीस हवालदार मनोज बदाडे यांनी या भांडणात मध्यस्थी केली. मात्र त्यांच्यावरही संशयितांनी हल्ला केला. याप्रकरणी लोणकर यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नोकरी करणारे लोणकर आणि त्यांच्या तीन मित्रांनी कात्रज चौकातील एका स्टॉलवर चहा घेण्याचे ठरवले. लोणकर घटनास्थळी त्यांची दुचाकी उभी करत असताना हल्लेखोरांपैकी एकाने त्यांच्यावर शेरेबाजी केली.
खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
लोणकर यांनी त्यास उत्तर दिले, ज्यामुळे त्यांच्यात जोरदार वाद झाला, असे भारती विद्यापीठ पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ काळसकर यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी चारही तरुणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. तर आता पुढील तपास सुरू करण्यात आल्याचे काळसकर यांनी सांगितले आहे.