पुणे जिल्ह्यात डेंग्यू, चिकनगुनियाचं थैमान; आरोग्य यंत्रणांकडून उपाययोजना सुरू, तुम्ही अशी घ्या काळजी
गेल्या काही दिवसांमध्ये पुणे (Pune) जिल्ह्यात डेंग्यू (Dengue) आणि चिकनगुनियाच्या (Chikungunya) रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुण्यात डेंग्यू, टायफॉईड (Tiphiid) , चिकुनगुनिया, कावीळच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे.
पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये पुणे (Pune) जिल्ह्यात डेंग्यू (Dengue) आणि चिकनगुनियाच्या (Chikungunya) रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुण्यात डेंग्यू, टायफॉईड (Typhoid) , चिकुनगुनिया, कावीळच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे. या आजारांमध्ये ताप (Fever), अतिसार, उलट्या होणे (Vomit), डोकेदुखी (Headache) आणि सांधेदुखीसारखी (Arthritis) लक्षणे दिसून येतात. गेल्या दोन आठवड्यांत या रुग्णांमध्ये सरासरी 7 ते 10 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. (The number of patients with dengue and chikungunya is increasing rapidly in Pune district)
अचानक का वाढले डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण?
गेल्यावर्षी लॉकडाऊनकाळात लोकांचं बाहेरचं खाणं बंद झालं होतं. त्यात गेल्यावर्षी पावसाळ्यातही अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना लॉकडाऊन काळात फारशी सूट नव्हती. त्यामुळे लोकांचा घराबाहेरचा वावर कमी होता. या कारणाने विषाणूजन्य आजारांचं प्रमाण दरवर्षीपेक्षा गेल्यावर्षी कमी झालं होतं. पण आता अनलॉक झाल्याने लोकांनी रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि जंकफूड खायला पुन्हा एकदा सुरूवात केली आहे. याचा परिणाम आता आरोग्यावर होऊ लागला आहे. परिणामी आजारांचं प्रमाण वाढत आहे.
सातत्याने वाढत आहेत विषाणूजन्य आजारांचे रुग्ण
जुलै महिन्यात पुण्यात डेंग्युचे 107 संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी 86 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. याशिवाय ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत डेंग्युचे 87 संशयित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 18 जणांना डेंग्युची लागण झालेली आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्येही अनेकजण डेंग्युसदृष्य आजारावर उपचार घेत आहेत. यामध्ये संशयित रुग्णांची संख्याही शेकड्यांमध्ये आहे.
जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत पुणे शहरात स्वाईन फ्लूचे 65, चिकनगुनियाचे 84, डेंग्यूचे 135 तर मलेरियाचे 2 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकीकडे कोरोना उपाययोजनांध्ये व्यस्त असलेल्या आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे.
प्रशासनाकडून काय उपाययोजना?
डेंग्यू किंवा चिकनगुनियासारखे लक्षणं एखाद्या व्यक्तीमध्ये आढळल्यास त्याची तात्काळ तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. शिवाय ज्या जागांवर डासांची उत्पत्ती होऊ शकते अशा ठिकाणी विशेष स्वच्छता ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जलाशयाच्या ठिकाणी गप्पी मासे सोडावेत जेणेकरून डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण आणता येईल असंही सांगण्यात आलं आहे. नागरिकांनाही स्वच्छता ठेवण्याचं आणि लक्षण आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
झिका व्हायरसमुळे बेलसर गावात उपाययोजना
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिका व्हायरचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर प्रशासनाने सतर्क होत विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पुरुषांच्या विर्यात झिकाचे विषाणू आढळत असल्याने गर्भधारणा टाळण्यासाठी व सुरक्षित संभोग व्हावा यासाठी बेलसर गावात पुरुषांना निरोधचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या वतीने भोंगागाडीच्या माध्यमातून दारोदारी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. गावात सर्व ठिकाणी धूर फवारणी केली जात आहे. गावातल्या 24 गरोदर महिलांना मच्छरदाणी आणि डास प्रतिबंधक मलम देण्यात आले आहेत. महिलांच्या रक्ताचे नमुनेही तपासले जात आहेत. गावात विविध पद्धतीच्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
काय काळजी घ्यायला हवी?
खासगी रुग्णालयांमध्ये विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. पावसामुळे पाणी साचून राहिल्याने डासांचं प्रजनन होतं आणि यामुळेच हे आजार पसरत असल्याचं डॉक्टर सांगत आहेत. वेळीच निदान झाल्यास योग्य उपचार घेऊन रुग्ण बरा होऊ शकतो, त्यामुळे ताप आल्यास अंगावर न काढता वेळेवर चाचणी करून घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
पावसाळ्यात पाणी साचल्याने त्यात डासांची उत्पत्ती होते. त्यातून डेंग्यू, चिकन गुनियासारखे आजार बळावतात. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीची ठिकाणं शोधून ती नष्ट करणं गरजेचं आहे.
घराच्या परिसरात, कुंड्या, डबके, टायर, मडके, पाईप किंवा जिथे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे तिथे पाणी साठून राहू देऊ नका. घरातली सगळी भांडी पालथी ठेवून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा.
मोठ्या टाक्या, डबके यांमध्ये डासांची उत्पत्ती रोखणाऱ्या औषधांची फवारणी करा. घराच्या परिसरात पाणाी साचू देऊ नका. डास प्रतिबंधक जाळीचा वापर करा. घरात वावरतानाही अंगभर कपड्यांचा वापर करा.
वातावरण बदलल्यामुळे लहान मुलांमध्येही व्हायरल फिव्हरचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे पालकांनी लहान मुलांच्या आरोग्याकडे विशेष सक्ष देणं गरजेचं आहे.
अचानक वाढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, डोळेदुखी ही डेंग्यूच्या आजाराची लक्षणं आहेत. यासोबतच कधीकधी डेंग्युमुळे रक्तस्रावही होऊ शकतो. असं झाल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवून तपासणी करून घ्या.
कोरोनाचं सावटही पूर्णपणे गेलेलं नाही. त्यामुळे ताप जाणवल्यास डॉक्टरांना दाखवून आवश्यक चाचण्या करून घ्या.
संबंधित बातम्या :