Pune crime : एटीएम सेन्सरमध्ये बिघाड; पैसे लांबवत चोरट्यांचा पोबारा, पुण्याच्या मॉडेल कॉलनीतला प्रकार
बँकेच्या अधिकाऱ्याने मंगळवारी याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे. दोन संशयितांनी किऑस्कमध्ये येऊन कॅश डिस्पेन्सरच्या सेन्सरमध्ये छेडछाड केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
पुणे : एटीएममधून (ATM) पैसे चोरणाऱ्या चोरट्यांचा पुणे शहर पोलिसांनी शोध सुरू केला आहे. मॉडेल कॉलनीतील एटीएम किऑस्कमधील कॅश डिस्पेन्सरच्या सेन्सरमध्ये छेडछाड करण्यात आली होती. याचाच गैरफायदा घेत पैसे काढण्यात आले होते. रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. आता ही रोकड घेऊन पळ काढलेल्या दोन अज्ञात संशयितांचा शोध पोलिसांनी (Police) सुरू केला आहे. ही घटना 27 एप्रिल रोजी सकाळी 11.50 ते दुपारी 12.20च्या दरम्यान घडली. मॉडेल कॉलनीतील दीप बंगला चौकात असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम कियॉस्कमध्ये हा प्रकार झाला. एका ग्राहकाने आपल्या खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र या बिघाडामुळे त्यास रक्कम मिळू शकली नाही. मात्र काही वेळानंतर पैसे खात्यातून वजा (Debited) झाल्याचा मेसेज आल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
सेन्सरमध्ये छेडछाड
याप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्याने मंगळवारी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे. दोन संशयितांनी किऑस्कमध्ये येऊन कॅश डिस्पेन्सरच्या सेन्सरमध्ये छेडछाड केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. एक ग्राहक किऑस्कवर आला आणि 5,000 रुपये काढण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र एटीएम मशीन डिस्पेंसर, सेन्सरमध्ये बिघाड असल्याने रोख रक्कम निघू शकली नाही. त्यामुळे तो ग्राहक परत गेला. ग्राहक परत गेल्यानंतर दोन संशयीतांकडून हा प्रकार घडला.
अनधिकृतरित्या काढले पाच हजार
दोन संशयित काही मिनिटांनंतर किऑस्कवर आले आणि त्यांनी एटीएमच्या कॅश ट्रेमधून टूल वापरून 5,000 रुपये काढले, असे तपासात पुढे आले. दरम्यान, पैसे काढण्याचा प्रयत्न करूनही रोकड मिळाली नाही, त्यातच पैसे काढल्याचा संदेश संबंधित ग्राहकाला मोबाइलवर मिळाला. ग्राहकाने बँकेशी संपर्क साधला. त्यानंतर ही घटना उघडकीस आल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर दोन संशयीत या प्रकरणात असून त्यांचा शोध सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अलिकडे एटीएममधून पैसे चोरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. कधीकधी तांत्रिक बिघाडाचाही चोरटे गैरफायदा घेत असल्याचे दिसून आले आहे. आता या दोन संशयितांचा शोध सुरू झाला आहे.