वडील अन् सासऱ्याचा राग पुणे NDA वर, ताण मात्र पोलिसांना

| Updated on: Jul 21, 2023 | 10:34 AM

Pune Crime News : दोन दिवसांपूर्वी पुणे शहरात दोन दहशतवादी पकडले गेले. त्यानंतर पुणे पोलिसांना 'एनडीए'मध्ये बॉम्ब स्फोट घडवण्याची धमकी आली. धमकीनंतर पोलिसांची चांगलीच धावपळ उडली. आरोपीला पकडले गेले अन् वेगळेच कारण समोर आले.

वडील अन् सासऱ्याचा राग पुणे NDA वर, ताण मात्र पोलिसांना
Follow us on

पुणे | 21 जुलै 2023 : पुणे शहरात दोन दिवसांपूर्वी मोठी कारवाई झाली होती. दीड वर्षांपासून राहत असलेल्या दोघ दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली. या दहशतवाद्यांचा संबंध जयपुरात सीरियल ब्लास्ट प्रकरणात होता. त्यांच्यावर एनआयएने पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. हे प्रकरण सुरु असताना पुणे पोलिसांना आणखी एक फोन आला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) उडवून देण्याची धमकी त्या फोनमधून देण्यात आली. त्यानंतर पोलिसांची धावपळ उडली.

कोणी दिली धमकी

पुणे येथील अमोल महादेव वाघ (वय-३३, रा. इंदिरा वसाहत, उत्तमनगर) याने पुणे पोलिसांना गुरुवारी फोन केला. यावेळी त्याने सांगितले की, पुणे अन् अहमदनगर येथील सहा जण बॉम्ब स्फोट करणार आहेत. तीन ठिकाणी हे बॉम्बस्फोट करतील. त्यात एनडीएचा समावेश आहे. त्या लोकांकडे मशीन गन आणि आरडीएक्ससुद्धा आहे. कॉल करणाऱ्याने बॉम्ब स्फोट करणाऱ्या त्या दोघांचे फोन नंबर ही दिले.

पोलिसांची उडाली धावपळ

पोलिसांचा फोन येताच उत्तमनगर पोलिसांनी‌ एनडीए गाठले. त्यांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. एकाबाजूला एनडीएमधील यंत्रणा अलर्ट केली. पोलिसांनी कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला. त्याच्या मोबाईलचे लोकेशन शोधले. त्याला पकडून चौकशी सुरु केली. अमोल महादेव वाघ यानेच हा फोन केला होता, हे स्पष्ट झाले.

हे सुद्धा वाचा

का केला होता फोन

अमोल वाघ याने पोलिसांना फोन केला होता. त्याच्या वडिलांनी शेत विकले होते. त्यानंतर त्याला काहीच पैसे दिले नाही. त्यामुळे वडील आणि सासऱ्यांचा फोन नंबर त्याने पोलिसांना दिला. हे दोन्ही जण बॉम्बस्फोट घडवणार असल्याचे सांगितले. दोघांना मानसिक त्रास देण्यासाठी दारूच्या नशेत त्याने फोन केला होता. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. कारण दोन दिवसांपूर्वी कोथरुडमध्ये रतलाममधील दोन दहशतवादी पकडले गेले होते. हे दोन्ही आरोपी सुमारे दीड वर्ष पुणे शहरात राहत होते. त्यानंतर पोलिसांना त्याचा पत्ता लागला नव्हता.