हिमाचल प्रदेशात पर्यटनासाठी गेले, पावसामुळे अडकले, पुणे शहरातील पर्यटकांचे काय आहे अपडेट
Pune News : पुणे जिल्ह्यातील पर्यटक हिमाचल प्रदेशात अडकले होते. या पर्यटकांशी संपर्क होत नव्हता. आता त्यांच्याशी संपर्क करण्यात प्रशासनाला यश झाले आहे. सर्व पर्यटकांचे अपडेट त्यांच्या नातेवाईकांना दिले आहे.
पुणे, दिनांक 13 जुलै 2023 : उत्तर भारतात पावसाचा कहर सुरु आहे. हिमाचल प्रदेशात पावसामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. नवी दिल्लीत यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली अन् हिमाचल प्रदेशाचे पावसामुळे बेहाल झाले आहेत. हिमाचल प्रदेशातील पर्यटकांसाठी आवडते ठिकाण असलेल्या कुल्लू, मनाली जिल्ह्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. हजारो लोक या परिस्थितीमुळे अडकले आहेत. दरम्यान, पावसामुळे पुणे शहरातील पर्यटन हिमाचल प्रदेशात अडकले आहे. त्यातील काही जणांशी संपर्क होत नव्हता. आता या प्रकरणी अपडेट प्रशासनाने दिले आहे.
किती पर्यटक अडकले
पुणे येथील १७ पर्यटक हिमाचल प्रदेशात फिरण्यासाठी गेले होते. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न पुणे जिल्हा प्रशासनाने सुरु केला आहे. पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून त्यासाठी हिमाचल प्रदेश सरकारला संपर्क केला गेला. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत १७ पैकी दहा पर्यटकांशी संपर्क साधण्यात यश आले होते.
सात जणांशी संपर्क होत नव्हता. बुधवारी पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर दुपारी त्या सात पर्यटकांसोबत संपर्क झाला. या पर्यटकांना सुरक्षित स्थळी नेले गेले आहे. सर्व जण सुरक्षित आहे. या पर्यटकांना परत आणण्यासाठी हिमाचल प्रदेश सरकारसोबत महाराष्ट्र शासनाकडून संपर्क केला जात आहे, असे पुणे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हे पर्यटक गेले पोलीस ठाण्यात
पिंपरी चिंचवडमधील माळुंजकर कुटुंबातील पाच जण रविवारी मनालीवरुन कुलूकडे जात होते. पावसामुळे रस्ते बंद झाल्यामुळे ते मंडी येथे अडकले. त्यानंतर दोन दिवस त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी प्रशासनाशी संपर्क साधला. परंतु परिस्थिती सुधारल्यामुळे हे पर्यटक स्वत:हून पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी आपण सुरुक्षित असल्याचे पोलीस ठाण्यातून नातेवाईकांना कळवले. हिमाचल प्रदेशातील दळणवळण सध्या बंद आहे. यामुळे या सर्व पर्यटकांना राज्यात कसे परत आणता येईल, यासंदर्भात महाराष्ट्र शासन हिमाचल प्रदेश सरकारच्या संपर्कात आहेत.